Vi कंपनी बुडाल्यास तुम्हालाच नाही, तर सरकारलाही होणार १.६ लाख कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 09:41 AM2021-08-09T09:41:50+5:302021-08-09T09:56:48+5:30

Vodafone Idea : जर १.६ लाख कोटी रूपयांच्या स्पेक्ट्रम आणि एजीआरच्या रकमेसह आणि मोठं कर्ज, नुकसानीमुळे कंपनी बुडाल्यास सरकारलाही मोठं नुकसान होईल.

सध्या दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. दूरसंचार क्षेत्रात (Telecom Sector) रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) आगमनानंतर सर्वच कंपन्यांचे धाबे दणाणले होते.

सध्या आर्थिक संकटाचा सामना करणारी व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) ही कंपनी बुडाली तर केवळ ग्राहकांनाच नाही तर सरकारलाही लाखो कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार होणार आहे.

जवळपास स्पेक्ट्रमच्या १.६ लाख कोटी रूपयांचा भरणा आणि एजीआर (AGR) च्या रकमेसह व्होडाफोन आयडिया कंपनीला होणारं मोठं नुकसान आणि कर्जामुळे कंपनी बुडण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे.

व्होडाफोन आयडियानं सरकारी आणि खासगी बँकांमधून कमीतकमी २३ हजार कोटी रूपयांचं कर्ज घेतलं आहे.

त्यापैकी सर्वाधिक कर्ज ११ कोटी रूपये हे स्टेट बँक ऑफ इंडियामधून घेतलं आहे. बँकांनी कंपन्यांसाठी हजारो कोटी रूपयांची गॅरंटी आणखी वाढवली आहे, ज्यामुळे डिफॉल्टचा धोकाही वाढला आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनी बुडाल्यास दूरसंचार विभाग आणि सरकारला मोठं नुकसान होणार आहे. अनिल अंबानी यांच्या (Anil Ambani) रिलायन्स कम्युनिकेशन्स (Reliance Communications) आणि एअरसेल (Aircel) च्या घटनांनंतर खराब बसूली आणि फेडलं न गेलेलं कर्जाचं चित्र गंभीर दिसून येत आहे. या ठिकाणी अद्यापही कोट्यवधी रूपये अडकले आहेत.

व्होडाफोन आयडिया या कंपनीवर सध्या १.८ लाख कोटी रूपयांचं कर्ज आहे आणि मार्च तिमाहीदरम्यान ७ हजार कोटी रूपयांच्या नुकसानीसह कंपनीच्या समोरील आर्थिक समस्याही वाढल्या आहेत.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजनुसार त्यांच्या १.८ लाख कोटी रूपयांचं कर्ज आहे. त्यांच्याकडे निधीची उपलब्धता एक मोठं आव्हान बनलं आहे.

Vodafone-Idea वर बँकांचं २३ हजार कोटी रूपये, AGR चे ६१ हजार कोटी आणि ९६,३०० कोटी रूपये डिफर्ड स्पेक्ट्रम पेमेंट्स आहेत. याप्रमाणे कंपनीवर जवळपास १.८ लाख कोटी रूपयांचं देणं आहे.

याशिवाय काही हजार कोटी रूपयांची बँक गॅरंटी, स्पेक्ट्रम आणि एजीआरची कत्तम आणि बँकेच्या कर्जावरील व्याजही देणं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्य टेलिकॉम कंपन्या म्हणजेच Reliance Jio, Bharti Airtel यांच्या तुलनेत Vodafone-Idea चा एव्हरेज रेव्हेन्यू पर युझर सर्वात कमी होता.

व्होडाफोन आयडियाचा Arpu १०७ रूपये होता, तर रिलायन्स जिओचा Arpu १३८ रूपये आणि एअरटेलचा Arpu १४५ रूपये होता.

सरकारला विनंती केल्यानंतर कुमार मंगलम बिर्ला यांनी (Kumar Mangalam Birla) यांनी कंपन्याच्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि डायरेक्टर या पदावरून राजीनाम दिला होता.

व्होडाफोन आयडियानं त्यांचा राजीनामा मंजुरही केला होता. व्होडाफोन आयडियामधून बिर्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात पडले होते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठं नुकसान झालं होतं.

त्यानंतर व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळानं नॉन एक्झिक्युटिव्ह संचालक हिंमांशू कपानिया यांना नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून नियुक्त केलं होतं.