Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:19 IST2026-05-19T15:16:32+5:302026-05-19T15:19:52+5:30
Shivraj Motegaonkar News: ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच फुटली होती. या प्रकरणात सीबीआयने देशभरात धाडसत्र सुरू केले आणि शिवराज मोटेगावकर याला अटक झाली.

Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
Shivraj Motegaonkar Latest News : आधी लातूर, नंतर मराठवाडा आणि हळूहळू महाराष्ट्रभर जाळे पसरलेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयनेअटक केली. पण, ही अटक करण्यापू्र्वी मोटेगावकर याची चौकशी करण्यात आली. या ८ ते १० तास चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. सध्या मोटेगावकर हा सध्या सीबीआय कोठडीत आहे.
आरसीसी क्लासेसचा संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या जाळ्यात अडकण्याची अनेक कारणे समोर आली आहेत. त्यात मोटेगावकर याने स्वतःच्या मुलासाठी प्रश्नपत्रिका फोडल्याचेही म्हटले जात आहे. मोटेगावकरला का व कशी अटक झाली, याची माहिती सूत्रांनी दिली.
नीट पेपर फुटीप्रकरण, मोटेगावकरचे कनेक्शन
१) तपासाअंती पेपरफुटीचे संघटितपणे रॅकेट चालविणाऱ्या गटात ते सहभागी असल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.
२) मोबाईल आणि त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांना परीक्षेच्या आधीच पेपर मिळाला होता, हे स्पष्ट होत आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्न आणि उत्तरपत्रिका होती.
३) नीट परीक्षेच्या पेपर सेटरशी त्यांचा संपर्क आलेला आहे.
४) मिळालेला पेपर त्यांनी पुढे कोणाला दिला, हे अजूनही त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे तपासासाठी अटक करून कोठडी आवश्यक असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
५) त्यांच्याकडे आलेला प्रश्नसंच व इतर माहिती त्यांनी डिलिट करण्याचा प्रयत्न केल्याचेही सीबीआयचे म्हणणे आहे.
मोटेगावकरला अटक कशी झाली?
१५ मे रोजी लातूर येथे निवासस्थानी जवळपास नऊ तास चौकशी झाली. सराव प्रश्नपत्रिका, मोबाईल व डिजिटल पुरावे घेऊन पथक परत गेले. १७ मे रोजी ते चौकशीसाठी पुणे येथे सीबीआय कार्यालयात दाखल झाले. तिथे त्यांची सुमारे ११ तास चौकशी चालली. त्यानंतर सीबीआयने अटक करून न्यायालयात हजर केले.