"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 18:24 IST2026-05-19T18:23:50+5:302026-05-19T18:24:40+5:30
भारतीय जनतापक्षाचे खासदार धर्मपूरी अरविंद यांनी सोमवारी मोठी भविष्यवाणी केली आहे. यामुळे काँग्रेस हायकमांडचे टेन्शन वाढू शकते. तेलंगणाचे ...

"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार
भारतीय जनतापक्षाचे खासदार धर्मपूरी अरविंद यांनी सोमवारी मोठी भविष्यवाणी केली आहे. यामुळे काँग्रेस हायकमांडचे टेन्शन वाढू शकते. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे काँग्रेससोबत 'सुवेंदू अधिकारी' यांच्यासारखा व्यवहार करू शकतात. गेल्या ६ वर्षांपूर्वी बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, तसेच काहीसे रेवंत रेड्डीही करू शकतात. असा दावा तेलंगणातील निजामाबादचे खासदार अरविंद यांनी केला आहे.
भाजप खासदार अरविंद म्हणाले, काँग्रेस नेतृत्वाने पक्षात अनेक दशके घालवलेल्या ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करून रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्री निवडण्याची मोठी चूक केली आहे. सुवेंदू अधिकारी, हे भाजपमध्ये सामील झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांचे सर्वात मोठे विरोधक बनले होते. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच, १९८५ आणि १९९४ च्या पराभवाप्रमाणेच २०२८-२९ च्या आगामी निवडणुकीतही तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला अभूतपूर्व पराभवाचा सामना करावा लागेल, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी? -
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हैदराबादमध्ये रेवंत रेड्डी यांना अप्रत्यक्षपणे भाजपसोबत येण्याची ऑफर दिली होती. त्यांनी हैदराबादमध्ये जवळपास ९४०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानंतर एका कार्यक्रमात संबोधित करताना ते म्हणाले, "आपले रेवंतजी म्हणाले होते की, आपण राजकीय भाष्य करणार नाही. यामुळे मीही करणार नाही. मात्र, अराजकीय गोष्ट अशी आहे की, केंद्राने १० वर्षांत गुजरातला जेवढे दिले, तेवढे मी आपल्यालाही द्यायला तयार आहे. मात्र मी असे केल्यास, आपल्याला आता जे मिळतेय ते अर्धे होईल." यानंतर, मोदी हसत पुढे म्हटले, "आपल्याला जेथे पोहोचायचे आहे, पोहोचू शकणार नाही, त्यामुळे, माझ्यासोबत येणेच उत्तम!
यावर वेयासपीठावर उपस्थित असलेल्या रेवंत रेड्डी यांनी केवळ स्मितहास्य केले होते. या विधानाचा संदर्भ देत खासदार अरविंद म्हणाले की, ते भाजपचे फार छोटे कार्यकर्ते आहोत. यामुळे आपल्याला याच्या अचूक राजकीय अर्थाची कल्पना नाही. मात्र, पुढील दोन वर्षांत तेलंगणामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी बघायला मिळतील आणि भाजप सत्ता स्थापन करेल.