मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 18:47 IST2026-05-19T18:46:24+5:302026-05-19T18:47:38+5:30
अहमदाबादच्या निकोल भागात गेल्या आठवड्यात एका ज्वेलरी शोरूममध्ये काम करणाऱ्या हर्षिदा शेट्टी नावाच्या सेल्स गर्लने कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरले होते.

मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
अहमदाबादच्या निकोल भागात गेल्या आठवड्यात एका ज्वेलरी शोरूममध्ये काम करणाऱ्या हर्षिदा शेट्टी नावाच्या सेल्स गर्लने कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरले होते. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत होते. याच दरम्यान आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एका आठवड्यापूर्वी चोरी करणारी हर्षिदा शेट्टी आता क्राईम ब्रँडच्या जाळ्यात अडकली आहे. हर्षिदाने आपल्या मॅरिड बॉयफ्रेंडसोबत संसार थाटण्यासाठी ही चोरी केली होती. चोरी केल्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले. मात्र याच काळात हर्षिदाची मोठी फसवणूक झाली. हर्षिदा जेव्हा अंघोळीसाठी गेली, तेव्हा तिचा बॉयफ्रेंड सर्व दागिने घेऊन पसार झाला.
अहमदाबाद क्राईम ब्रँचला माहिती मिळाली की, हर्षिदा चोरीचे दागिने विकण्यासाठी माणेकचौक येथे आली आहे. क्राईम ब्रँडच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत हर्षिदाला दागिने विकण्यापूर्वीच ताब्यात घेतलं. अटकेनंतर हर्षिदाला क्राईम ब्रँचच्या कार्यालयात आणण्यात आलं, जिथे तपासादरम्यान तिच्याकडून १८ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी सांगितलं की, हर्षिदाच्या चौकशीत समोर आलं आहे की, दागिने चोरल्यानंतर ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेली होती.
आंघोळीला गेली अन् घात झाला
दोघेही चोरीचे दागिने घेऊन एकत्र राहत होते. याच दरम्यान, एक दिवस हर्षिदा जेव्हा आंघोळीला गेली, तेव्हा तिचा बॉयफ्रेंड तिथे फक्त १८ लाख रुपयांचे दागिने सोडून उर्वरित सर्व दागिने घेऊन पळून गेला. जेव्हा हर्षिदाला ही गोष्ट समजली, तेव्हा ती प्रचंड घाबरली. तिने बॉयफ्रेंडशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने आपला फोन बंद केला होता.
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
शोरूममध्ये ११ महिन्यांपासून काम
हर्षिदाच्या पुढील चौकशीत समोर आलं की, तिचं आधी लग्न झालं होतं आणि नंतर तिचा घटस्फोट झाला होता. ती शोरूममध्ये ११ महिन्यांपासून काम करत होती, त्यामुळे मालकाचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. जेव्हा जेव्हा मालकाला व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पाठवायचं असायचं, तेव्हा ते हर्षिदालाच ज्वेलरी घेऊन पाठवायचे. याच काळात हर्षिदाची भेट एका तरुणाशी झाली.
बॉयफ्रेंडच्या दुकानातून दागिने चोरले
हर्षिदा आणि तरुण गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होते. तरुण विवाहित होता आणि त्याला मुलंही होती. हे माहीत असूनही दोघे गेल्या चार महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. हर्षिदाने आपल्या बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून दुकानातून दागिने चोरले. मात्र शेवटी हर्षिदाला तिच्या बॉयफ्रेंडनेच दगा दिला. हर्षिदाला अटक करून निकोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आता पोलीस तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेत आहेत.