Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!

By देवेश फडके | Updated: May 19, 2026 20:48 IST2026-05-19T20:37:10+5:302026-05-19T20:48:34+5:30

Adhik Maas 2026 Gajanan Vijay Parayan Method: अधिक महिन्याचा पहिला गुरुवार ‘श्री गजानन विजय’ सर्वोत्तम मानला गेला आहे. का आणि कसा? सविस्तर जाणून घ्या...

adhik maas 2026 know everything about method of recite the shri gajanan vijay granth gajanan maharaj always support and you to receive infinite grace and virtue | Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!

Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!

Adhik Maas 2026 Gajanan Vijay Parayan: गण गण गणात बोते... गण गण गणात बोते... महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातील असंख्य भक्तगणांचे गजानन महाराज श्रद्धास्थान आहेत. आपापल्यापरिने गजानन महाराजांची सेवा करतात. ‘श्री गजानन विजय’ हा अतिशय पवित्र ग्रंथ असून, अधिक मासात याचे आवर्जून पारायण करावे, असे म्हटले जाते. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात जेवढी उपासना करता येईल, तेवढी करावी, याचे अनेक पटींनी फल आणि पुण्य मिळते, असे सांगितले जाते. 

मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. रविवार, १७ मे २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे. सोमवार, १५ जून २०२६ पर्यंत अधिक ज्येष्ठ महिना असणार आहे. सोमवार, १५ जून २०२६ याच दिवशी निज ज्येष्ठ सुरू होत आहे. मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी निज ज्येष्ठ मास संपणार आहे.  या अधिक महिन्यात कुलदेवता, इष्टदेवता, श्रीविष्णू तसेच सद्गुरूंची विशेष उपासना, सेवा, नामस्मरण, पूजन, व्रत करावे, असे म्हटले जाते. ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथाचे पारायण कसे करावे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया...

एका दिवसांत श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करता येऊ शकते

संत श्री दासगणू महाराज विरचित ‘श्री गजानन विजय’ हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. या ग्रंथांतील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती, आध्यात्मिक तत्त्वज्ञान, जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे. काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात. जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात. या ग्रंथातील ओव्यांमधील एक ओवी "कोठोनी आलो आपण । याचे करा हो चिंतन", ही जीवनाचे तत्त्वज्ञान विशद करते. भक्तगण या ग्रंथाचे नित्यनेमाने पारायण, वाचन करतात. एका दिवसांत श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करता येऊ शकते, असे म्हटले जाते. 

श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ

‘श्री गजानन विजय’ ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ पठणात आहे, असे मानले जाते. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्ट फळ मिळते, असा भक्तांचा अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन अन् एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचे, असे म्हटले जाते. अधिक मास हा वारंवार येणारा कालावधी नाही. त्यामुळे अधिक मासात या ग्रंथाचे पारायण करणे पुण्यफलदायक मानले जाते. श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे. जीवनातील विविध समस्या, अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला गेल्याचे सांगितले जाते. 

‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण पद्धत, वेळ

‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण करताना शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावे. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव, स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज यांचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा. एका चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री गजानन महाराजांची तसबीर किंवा मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. सकाळी एक वेळ निश्चित करावी. शक्यतो ही वेळ चुकवू नये. पारायण करताना एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. पोथीला मनापासून नमस्कार करावा. ‘श्री गजानन विजय’ ग्रंथात जसे सांगितले असे, त्यानुसार पारायण करावे.

‘श्री गजानन विजय’ पारायण करताना संकल्प अवश्य करावा

सकाळी नित्याची देवपूजा करून ‘श्री गजानन विजय’ पारायण करण्यास बसावे. उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत, हे गजानन महाराजांना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा, म्हणून श्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हनात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे.

‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण करताना नेमके काय करावे?

पारायण करताना श्री गजानन महाराजांचे स्मरण करून पोथीला वंदन करावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी महाराज आपल्यासोबत आहेत, असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन झाल्यावर गंध, हळद-कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायणाची सांगता झाल्यावर यथाशक्ती दान करावे.

‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण करताना काय काळजी घ्यावी?

‘श्री गजानन विजय’ पोथीचे वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. पारायण करताना भक्तीभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. महाराजांच्या चरित्र कथांचा आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता.

अधिक मासात ‘श्री गजानन विजय’ पारायण केल्याने काय होते?

‘श्री गजानन विजय’ पोथीचे पारायण केल्यावर मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. सुख-समृद्धी वाढते. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते. पुण्य संचय वाढतो. गजानन महाराजांच्या सेवेचे समाधान प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. गजानन महाराजांवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवावा. महाराजांप्रति केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवावा. निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. 

‘श्री गजानन विजय’ या ग्रंथाचे पारायण किती अन् कशा प्रकारे करता येते?

- सप्ताह पारायण: सात दिवस दररोज ३ अध्याय वाचून हे पारायण केले जाऊ शकते. मंदिरांमध्ये व घरी सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो.

- तीन दिवसीय पारायण: तीन दिवस दररोज ७ अध्याय (किंवा ९, ७ व ५ अध्याय) वाचून हे पारायण केले जाते. दशमी, एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संतकवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे.

- एक दिवसीय पारायण: एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करता येऊ शकते. आजच्या धकाधकीच्या काळात एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात. ते एक दिवसीय पारायण. 

- सामूहिक पारायण: एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करता येऊ शकते. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ (२१ अध्याय ) वाचन करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल. 

- चक्री पारायण किंवा २१ दिवसीय पारायण: खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय वाचन करून २१ दिवसात हे पारायण करता येऊ शकते. यात भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. येथे प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

- संकीर्तन पारायण: एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे, असे या संकीर्तनाचे स्वरूप असावे. ही एक श्रवण भक्ती आहे. व्यासपीठावर बसून पारायण करतात, त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगांचे निरुपण करतात, काही अनुभव सांगतात. हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळी-वेगळी पर्वणीच असते. असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण.

- गुरुवारचे पारायण: गुरूवार हा महाराजांचा शुभ दिन व २१ हा महाराजांचा शुभ अंक. २१ भक्तांचा गट तयार करून दर गुरूवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावयाचा व सगळे मिळून २१ अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरूवारी एक पारायण व २१ गुरूवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते, असा द्विगुणीत लाभ मिळतो. एका गटात  एकवीस भक्तच भाग घेऊ शकतात. हे गटाने करायचे पारायण असल्यामुळे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. अन्यथा ते पारायण पूर्ण होत नाही.

- विशेष म्हणजे अधिक मासातील गुरुवारी २१ मे तारीख येत आहे. तसेच याच दिवशी अतिशय शुभ मानला गेलेला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. विशेष म्हणजे गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सकाळी ०६ वाजून ०५ मिनिटांपासून ते उत्तररात्रौ ०२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत म्हणजेच संपूर्ण दिवस गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. गजानन महाराजांचा शुभ दिन, शुभ अंक आणि गुरुपुष्यामृत योगासारखा अद्भूत योग असा महासंगम जुळून आलेला आहे. ही सुवर्णसंधी साधता येऊ शकते.

॥ श्री गजानन जय गजानन ॥

॥ गण गण गणात बोते ॥

 

Web Title : अधिक मास 2026: 'श्री गजानन विजय' का पाठ करें, कृपा होगी!

Web Summary : अधिक मास 2026 में, भक्तों को 'श्री गजानन विजय' का पाठ करने के लिए प्रोत्साहित किया जाता है। यह ग्रंथ और पाठ करने की विधियाँ बताई गई हैं, जिससे मनोकामनाएँ पूरी होती हैं और आध्यात्मिक विकास होता है। इस दौरान पाठ करना विशेष रूप से शुभ माना जाता है।

Web Title : Adhik Maas 2026: Recite 'Shri Gajanan Vijay,' blessings will follow!

Web Summary : In Adhik Maas 2026, devotees are encouraged to recite 'Shri Gajanan Vijay' for blessings. The text details the significance of this holy book and methods of recitation, promising fulfillment and spiritual growth. Reciting during this period is considered especially auspicious.