लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:19 IST2026-05-18T13:16:30+5:302026-05-18T13:19:28+5:30
लखीमपुर खिरी जिल्ह्यातील नॅशनल हायवे ७३० वर एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे.

फोटो - आजतक
लखीमपुर खिरी जिल्ह्यातील नॅशनल हायवे ७३० वर एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. ईसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरेहटाजवळ प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात टाटा मॅजिकमधील १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी ईसानगर येथील सामूहिक आरोग्य केंद्रात (CHC) दाखल करण्यात आलं आहे.
ईसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर सोमवार सकाळी ७ वाजता बरेहटाजवळ १४ प्रवाशांना घेऊन एक टाटा मॅजिक लखीमपुरहून बहराइचच्या दिशेने जात होती. त्याच वेळी, बहराइचच्या बाजूने येणाऱ्या एका भरधाव ट्रकशी तिची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात टाटा मॅजिकमधील ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर सामूहिक आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान आणखी दोन प्रवाशांनी आपला जीव गमावला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा मुख्यालयात पाठवले आहेत. तसेच जखमींना उपचारासाठी ईसानगर सामूहिक आरोग्य केंद्रात दाखल केलं आहे. धौरहरा क्षेत्राचे सीओ शमशेर सिंग यांनी सांगितलं की, आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरेहटा गावाजवळ लखीमपुर-बहराइच हायवेवर हा रस्ता अपघात झाला. यामध्ये ट्रक आणि मॅजिकची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात एकूण १० लोकांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ७ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. तसेच या अपघातात ४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली असून या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.