Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:40 IST2026-05-12T14:26:35+5:302026-05-12T14:40:35+5:30
भारताने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७२ अब्ज डॉलर्स किमतीचे ७२१ टन सोने आयात केले आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण वस्तू आयातीच्या सुमारे १०% आहे. यामुळे परकीय चलन साठ्यावर मोठा दबाव निर्माण होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी कमी करण्याचे आवाहन केले असून, त्यामुळे भविष्यात दागिन्यांच्या मागणीत घट होऊ शकते. लोक आता वजनाने हलके दागिने किंवा ‘डिजिटल गोल्ड’कडे वळण्याची शक्यता आहे.

सोन्यासाठी डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाचे मूल्य घसरते, ज्यामुळे परदेशातून येणारे मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स सामान महाग होते.

डॉलर रिझर्व्ह कमी झाल्यामुळे महागाई वाढल्यास आरबीआय व्याजदर चढेच ठेवू शकते, ज्यामुळे गृह किंवा इतर कर्ज महाग राहू शकतात.

परकीय चलन साठ्यात घट झाल्यामुळे देशाची ‘चालू खात्यातील तूट’ वाढते. यामुळे आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागून देशात महागाई वाढते.

पंतप्रधानांच्या आवाहनामुळे रत्ने, आभूषण उद्योगातही चिंतेचे वातावरण आहे. अखिल भारतीय रत्न आणि आभूषण परिषदेनुसार या उद्योगाशी थेट आणि अप्रत्यक्षरीत्या एक कोटींहून अधिक रोजगार जोडलेले आहेत. सोन्याची मागणी घटल्यास किरकोळ विक्री, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि डिझाइन क्षेत्रालाही फटका बसू शकतो.

















