Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:18 IST2026-05-12T10:16:19+5:302026-05-12T10:18:36+5:30
फरुखाबादच्या दिशेने जाणाऱ्या कासगंज एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं.

Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील शिवराजपूर पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. फरुखाबादच्या दिशेने जाणाऱ्या कासगंज एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही अफवा इतक्या वेगाने पसरली की, घाबरलेल्या प्रवाशांनी तातडीने 'चेन' खेचून ट्रेन थांबवली आणि वेग कमी होताच अनेकांनी खाली उड्या मारल्या.
अनवरगंजहून कासगंजला जाणारी १५०३९ कासगंज एक्स्प्रेस शिवराजपूरला पोहोचण्यापूर्वी ही धक्कादायक घटना घडली. रेल्वे रुळांवर पडलेल्या नवीन खडीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती. काही प्रवासी या धुळीला धूर समजले. याच दरम्यान, ट्रेनमधील एका प्रवाशाने "ट्रेनला आग लागली आहे, पळा, पळा..." असं ओरडून अफवा पसरवली. यामुळे एकच गोंधळ आणि चेंगराचेंगरीचं वातावरण निर्माण झालं.
ट्रेन में आग की अफवाह, डर से कूदे यात्री!
— News Leader (@NewsLeaderLive) May 12, 2026
कानपुर से फर्रुखाबाद जा रही ट्रेन में आग लगने की अफवाह फैलने से अफरा-तफरी मच गई. ट्रेन में सवार यात्रियों ने ट्रेन का चेन खींच दिया. अफवाह के कारण यात्री ट्रेन से कूदने लगे. जानकारी के मुताबिक ट्रेन में कोई आग नहीं लगी थी. पुलिस अफवाह… pic.twitter.com/G9Lm9bnptI
चालत्या ट्रेनमधून मारल्या उड्या
घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनची चेन खेचून ट्रेन थांबवली. ट्रेनचा वेग कमी होताच प्रवासी जीव वाचवण्यासाठी खाली उतरू लागले आणि काहींनी तर चालत्या ट्रेनमधून पटापट उड्या मारल्या. सुदैवाने या घटनेत कोणताही प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच शिवराजपूर पोलीस आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान ट्रेनला कुठेही आग लागली नसल्याचं स्पष्ट झालं. रुळांवर टाकलेल्या नवीन खडीमुळे उडणाऱ्या धुळीने हा संभ्रम निर्माण झाला होता.
तपास सुरू
स्टेशन मास्तरांनी स्पष्ट केलं की, आग लागल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेन काही काळ थांबवून तिची पूर्ण तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर ती पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. याच दरम्यान, पोलीस स्टेशनचे अधिकारी अमित सिंह यांनी सांगितलं की, अफवा पसरवणाऱ्या प्रवाशाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.