राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 08:45 IST2026-05-12T08:44:00+5:302026-05-12T08:45:27+5:30
NCP Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी असलेलं एक पत्र व्हायरल झालं असून, या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावंच नसल्याचं समोर आलं आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी असलेलं एक पत्र व्हायरल झालं असून, या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावंच नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आलं असतानाच पक्षाच्या प्रमुख आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये चूक झाली असून, ती लवकरच दुरुस्त केली जाईल, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या नेतृत्वाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. याचदरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपही झाले होते.
यादरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाला हल्लीच देण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या यादीचा फोटो समोर आला होता. तसेच या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आदी वरिष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आले नसल्याचे उघड झाले होते. तसेच या पत्रातील यादीमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावासमोर सरचिटणीस या पदाचा उल्लेख आहे.
A list of office bearers of the NCP circulating in the media has a clerical mistake and will be corrected soon.
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 11, 2026
आता या यादीवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलेलं असतानाच सुनेत्रा पवार यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच प्रसारमाध्यमांमध्ये फिरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकारिणीच्या यादीमध्ये काही तांत्रिक चुका आहेत. त्या लवकरच दुरुस्त केल्या जातील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.