केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 08:39 IST2026-05-12T08:37:28+5:302026-05-12T08:39:12+5:30
पाच राज्यांचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले. यातील प. बंगाल, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, केरळचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागत आहे.

केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
-चंद्रशेखर बर्वे, नवी दिल्ली
केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरी काँग्रेस हायकमांडला मुख्यमंत्र्यांची निवड करता आलेली नाही, किंबहुना, काँग्रेसलाही नाव निश्चित करण्याची कोणतीही घाई नसल्याची चर्चा रंगली आहे.
पाच राज्यांचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले. यातील प. बंगाल, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. आसाम, पुद्दुचेरीचेही जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, केरळचामुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागत आहे.
मुळात, विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन आणि महासचिव के. सी. वेणुगोपाल मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून हायकमांडवर दबाव टाकला जात आहे. निरीक्षक मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी आमदारांच्या भावना अध्यक्षांना कळविल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे नाव ठरविण्याचे सर्वाधिकार काँग्रेस अध्यक्षांना दिले आहेत.
केरळ काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते चर्चेस दिल्लीत रवाना
पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी काही ज्येष्ठ नेत्यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावले आहे. यात कन्नूरचे लोकसभा सदस्य के. सुधीकरन यांच्याव्यतिरिक्त एम.एम. हसन, व्ही.एम. सुधीरन, मुल्लापल्ली रामचंद्रन आणि के. मुरलीधर यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नेते ए. के. अँटनींशीही चर्चा होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरगे आणि राहुल गांधी येत्या एक-दोन दिवसांत केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, व्ही. डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथल यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जाते.
विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २३ मेपर्यंत
काँग्रेसला मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्याची घाई नाही. कारण, विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २३ मेपर्यंत आहे. अशात, मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेण्यासाठी हायकमांडकडे दहा दिवस आहेत. शिवाय, सरकार स्थापन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, याची काळजी हायकमांडकडून घेतली जात आहे.