लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:42 IST2026-05-12T10:40:19+5:302026-05-12T10:42:45+5:30

उत्तर प्रदेशातील झाशीमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे १४ दिवस झाल्यानंतर एका नववधूचा सासरी दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

jhansi bride dies on 14th day of marriage fell from terrace husband says she just joking and fellen off roof | लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील झाशीमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे १४ दिवस झाल्यानंतर एका नववधूचा सासरी दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही नेमकी खाली कशी पडली, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, "ती गच्चीच्या कठड्यावर बसून माझ्याशी मजा-मस्करी करत होती आणि त्याच वेळी तिचा तोल गेल्याने ती खाली पडली" असा दावा पतीने केला आहे. पोलिसांनी ही घटना संशयास्पद मानून तपास सुरू केला आहे.

प्रियंका मिश्रा (३० वर्षे) असं मृत महिलेचं नाव आहे. प्रियंका ही मूळची गोरखपूर जिल्ह्यातील असून तिचे वडील कस्टम विभागातून निवृत्त झाले आहेत. प्रियंका उच्चशिक्षित होती आणि तिने बी.एड. पूर्ण केलं होतं. २८ एप्रिल रोजी झाशीच्या सीपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिशन कंपाउंडमध्ये राहणाऱ्या शुभमसोबत तिचं लग्न झालं होतं.

मॅट्रिमोनिअल साईटवरून झालेली ओळख

पती शुभमने दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी त्यांची 'जीवनसाथी डॉट कॉम' या वेबसाईटवरून ओळख झाली होती. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झालं. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने २८ एप्रिल रोजी त्यांचा विवाह सोहळा पार पडला आणि २ मे रोजी रिसेप्शनही झालं होतं.

नेमकं काय घडलं?

सोमवारी सासरी कार्यक्रम सुरू होता. दुपारी साडेचारच्या सुमारास प्रियंका आपल्या खोलीत गेली. त्यानंतर पती-पत्नी दोघेही गप्पा मारण्यासाठी गच्चीवर गेले. शुभमच्या दाव्यानुसार, गच्चीवर असताना प्रियंका गंमत म्हणून कठड्यावर बसली. शुभमने तिला तसं करण्यास मनाई केली, पण तिने ऐकलं नाही. मस्करी करत असतानाच अचानक तिचा तोल गेला आणि ती दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली.

पोलिसांना संशय

या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कडाक्याचं ऊन असताना दोघेही गच्चीवर का गेले होते? याचं समाधानकारक उत्तर पतीला देता आलं नाही. या प्रकरणाबाबत पोलीस अधिकारी लक्ष्मीकांत गौतम यांनी सांगितलं की, "घटनेची माहिती मिळताच सीपरी बाजार पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली होती." पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ही घटना अपघात आहे की घातपात, हे शोधण्यासाठी टीम कसून तपास करत आहे. तसेच पतीसह कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात आहेत.
 

Web Title : शादी के 14 दिन बाद दुल्हन की मौत; पति का दावा- हादसा था।

Web Summary : उत्तर प्रदेश में शादी के 14 दिन बाद दुल्हन की छत से गिरकर मौत। पति का दावा है कि खेलते समय फिसल गई। पुलिस संदिग्ध मौत की जांच कर रही है।

Web Title : Bride dies 14 days after wedding; husband claims it was accident.

Web Summary : Uttar Pradesh bride died falling from roof 14 days after wedding. Husband claims she fell while playfully sitting on the ledge. Police investigate suspicious death.