हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:35 IST2026-05-12T11:34:17+5:302026-05-12T11:35:24+5:30
Himanta Biswa Sarma's swearing-in ceremony: आसाममधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर हिमंता बिस्व सरमा हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्टाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.

हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...
गुवाहाटी - आसाममधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर हिमंता बिस्व सरमा हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्टाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता बिस्व सरमा यांचे विशेष अभिनंदन केले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आसाममध्ये भाजपने १०२ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “आसामच्या जनतेने विकासावर विश्वास ठेवत भाजपला भरघोस समर्थन दिले. हिमंता बिस्व सरमा हे डायनामिक आणि व्हिजनरी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि जनकल्याणाच्या योजनांनी मोठे यश मिळवले.”
‘अरुणोदय’ आणि ‘लाडकी बहिणी’सारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. “हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे,” असेही ते म्हणाले.
यावेळी शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’चा विचार देशासमोर ठेवला. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी केला असून, देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचे कौतुक करत शिंदे म्हणाले, “अमित शाह यांची चाणक्यनीती पश्चिम बंगालप्रमाणेच आसाममध्येही यशस्वी ठरली. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले.” भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना शिंदे म्हणाले, “कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन मेहनत घेतली आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. हा विजय त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे.”
महाराष्ट्र आणि आसाममधील संबंधांचा उल्लेख करत त्यांनी जुनी आठवणही सांगितली. “चार वर्षांपूर्वी आम्ही याच रेडिसन हॉटेलमध्ये होतो. त्यावेळी आसाम सरकारने आम्हाला मोठी मदत केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले,” असे शिंदे म्हणाले.“आई कामाख्या देवीचा आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी आहे. डबल इंजिन सरकारमुळे आसाममध्ये विकास, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा विकास अधिक वेगाने होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.