सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:33 IST2026-05-12T15:32:51+5:302026-05-12T15:33:13+5:30
इराण आणि अमेरिका यांच्यातील सीजफायर धोक्यात आहे. इराणने युद्धाची जय्यत तयारी केली असून रशिया-चीनकडून शस्त्रे मागवली आहेत.

सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
अमेरिका आणि इराणमधील तणाव आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेलं आणि ३७ दिवस चाललेलं भीषण युद्ध सध्या सीजफायरमुळे थांबलं असलं, तरी ही शांतता वादळापूर्वीची शांतता मानली जात आहे. इराणने स्पष्ट केलं आहे की, आम्ही करारासाठी तयार आहोत, पण अमेरिकेने अटी लादल्या तर आम्ही संपूर्ण आखाती देशाला उद्ध्वस्त करू. इराणने पुन्हा एकदा युद्ध छेडले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ४ स्तरावर मोठी तयारी केली आहे.
इराणची 'चौफेर' युद्धनीती
१. विमानांची सुरक्षा आणि बंकर सेटअप
इराणने आपल्या हवाई दलाला सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी चाल खेळली आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी इराणने आपली लढाऊ विमाने शेजारील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पाठवली आहेत. याशिवाय, आपले महत्त्वाचे शस्त्रसाठा पुन्हा एकदा खोलवर असलेल्या बंकरमध्ये हलवला आहे, जेणेकरून शत्रूला त्याचा थांगपत्ता लागणार नाही.
२. होर्मुझची नाकाबंदी आणि डॉल्फिन पाणबुड्या
होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी इराणने 'डॉल्फिन' नावाच्या १६ छोट्या पाणबुड्या तैनात केल्या आहेत. अमेरिकेची कोंडी करण्यासाठी ही इराणची सर्वात मोठी रणनीती आहे.
३. रशिया-चीनकडून शस्त्रास्त्रांची रसद
सीआयएच्या अहवालानुसार, सीजफायरच्या काळाचा इराणने पुरेपूर फायदा उठवला आहे. इराणने रशिया आणि चीनकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि प्रगत रडार सिस्टीम मागवली आहे. इराणकडे सध्या बॅलिस्टिक मिसाईल्सचा मोठा साठा तयार असून त्यांनी आपली ७० टक्के युद्धक्षमता पुन्हा मिळवली आहे.
४. दीर्घकालीन युद्धाची तयारी
इराणला ठाऊक आहे की, युद्ध जितके लांबेल तितके अमेरिकेवर जागतिक दडपण वाढेल. यासाठी इराणने रशियाच्या मदतीने इंधन आणि रसद यांचा मोठा साठा जमा केला आहे. रसद पुरवठा खंडित होऊ नये यासाठी इराणने आधीच तजवीज केली आहे.
युएई आणि कुवैत इराणच्या निशाण्यावर?
यावेळच्या युद्धात इराणने आपले टार्गेट बदलले आहे. संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि बहरीन हे देश इराणच्या रडारवर आहेत. या देशांना अमेरिका आणि इस्रायलचे जवळचे मित्र मानले जाते. 'तेहरान टाइम्स'नुसार, युएई हा इस्रायलचा 'प्रॉक्सी' बनला असून त्याला धडा शिकवणे आवश्यक असल्याचे इराणचे म्हणणे आहे. गेल्या ३७ दिवसांच्या युद्धात इराणने युएईवर २००० हून अधिक हल्ले केले होते.