Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:47 IST2026-05-11T13:45:51+5:302026-05-11T13:47:15+5:30
Nashik TCS And Nida Khan : नाशिकमधील TCS प्रकरणातील आरोपी निदा खानच्या मोबाईलमधून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. निदाने पीडित तरुणीचं ब्रेनवॉश करण्यासाठी तब्बल १७१ धार्मिक लिंक्स पाठवल्याचा आरोप आहे.

Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
नाशिकमधील TCS प्रकरणातील आरोपी निदा खानच्या मोबाईलमधून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. निदाने पीडित तरुणीचं ब्रेनवॉश करण्यासाठी तब्बल १७१ धार्मिक लिंक्स पाठवल्याचा आरोप आहे. तसेच AIMIM नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला आर्थिक मदत केल्याचा संशयही आहे. पोलीस कोठडीत असताना तपास पथकाने निदा खानला तिच्या घरी आणि TCS कंपनीत नेलं होतं, तिथे घटनेशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी 'स्पॉट पंचनामा' करण्यात आला.
SIT प्रमुख संदीप मिटके यांनी या प्रकरणी निदा खानचा जबाब नोंदवला आहे. पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, संशयित निदा खानने पीडित तरुणीचं मतपरिवर्तन करण्यासाठी आणि तिला धर्माकडे आकर्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. निदा पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी आणि अनुष्ठान करायची. निदाने पीडितेला विशिष्ट धार्मिक पोशाख परिधान करण्यास भाग पाडलं असा आरोप आहे. SIT सध्या निदा खानचे आर्थिक व्यवहार आणि इतर संपर्कांची बारकाईने चौकशी करत आहे.
धर्माशी संबंधित १७१ लिंक्स
निदा खानने पीडितेच्या मोबाईलवर धर्माशी संबंधित १७१ वेगवेगळ्या लिंक्स पाठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. व्हिडीओ आणि लिंक्सच्या माध्यमातून पीडितेचं ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला गेला. सातत्याने दिली जाणारी ही धार्मिक शिकवण आणि व्हिडिओंच्या माध्यमातून पीडितेची विचारधारा बदलण्याचा प्रयत्न झाला. SIT चा तपास आता तांत्रिक आणि आर्थिक पुराव्यांवर केंद्रित झाला आहे. निदा खान फरार असताना तिला मदत करणाऱ्या 'अदृश्य' हातांचा शोध आता पोलीस घेत आहेत.
महिनाभर कुठे लपली होती निदा?
निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. निदाने डिलीट केलेले मेसेज, व्हिडिओ आणि कॉन्टॅक्ट नंबर्स रिकव्हर झाल्यानंतर अनेक मोठी रहस्य समोर येतील अशी पोलिसांना आशा आहे. महिनाभर निदा नेमकी कुठे लपली होती? एसआयटी तिची लोकेशन हिस्ट्री, कॉल डिटेल्स (CDR) आणि प्रवासाचा तपशील तपासत आहे, जेणेकरून तिला मदत करणाऱ्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करता येईल.
मतीन पटेल यांनी मदत केल्याचा संशय
आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी एसआयटीने निदाचं बँक पासबुक जप्त केलं आहे. तिला एखाद्या विशिष्ट गटाकडून फंडिंग मिळत असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वीच न्यायालयात व्यक्त केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, AIMIM नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी आपल्या माणसांमार्फत निदा खानला घरखर्चासाठी आर्थिक मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे.