‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:07 IST2026-05-11T13:06:10+5:302026-05-11T13:07:59+5:30

Nagpur : नव्वदच्या दशकात संपूर्ण देशाला वेड लावणाऱ्या “तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे…” या अजरामर गीताचे गीतकार जहीर आलम यांचे निधन झाले.

Zaheer Alam, lyricist of 'Tum Toh Thuhe Pardesi', passes away; He conquered the world with his words, but spent his life in poverty | ‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत

Zaheer Alam, lyricist of 'Tum Toh Thuhe Pardesi', passes away; He conquered the world with his words, but spent his life in poverty

नागपूर : नव्वदच्या दशकात संपूर्ण देशाला वेड लावणाऱ्या “तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे…” या अजरामर गीताचे गीतकार जहीर आलम यांचे निधन झाले. आपल्या शब्दांनी लाखो रसिकांच्या मनात घर करणारे जहीर भाई मात्र आयुष्यभर उपेक्षित आणि आर्थिक विवंचनेत राहिले. त्यांच्या निधनाने नागपूरच्या साहित्य-संगीत विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

मोमीनपुरा परिसरातील एका छोट्याशा घरात राहणारे जहीर आलम यांच्याबद्दल अनेक नागपूरकरांनाही माहिती नव्हती. देशभर गाजलेल्या गीताचे लेखक आपल्या शहरात अत्यंत साधेपणाने आणि संघर्षात जीवन जगत आहेत, याची कल्पना फार थोड्या लोकांना होती.

एका गाण्याने देश वेडा झाला

१९९० च्या दशकात “तुम तो ठहरे परदेसी…” हे गाणे अक्षरशः प्रत्येकाच्या ओठांवर होते. पानठेले, हॉटेल्स, बसस्थानके, गल्लीबोळ सर्वत्र हेच गाणे ऐकू यायचे. गायक अल्ताफ राजा एका रात्रीत सुपरस्टार झाला. मात्र त्या गीतामागचे शब्द रचणारे जहीर आलम मात्र प्रकाशझोतात आले नाहीत.

विशेष म्हणजे हे गाणे सुरुवातीला कव्वाली गायिका किरण पाटणकर आपल्या कार्यक्रमांमध्ये सादर करीत असत. नंतर अल्ताफ राजाने ते गायले आणि एका म्युझिक अल्बममध्ये त्याचा समावेश झाला. सुरुवातीला अल्बमला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र वर्षभरानंतर त्याच अल्बमला “तुम तो ठहरे परदेसी” हे नाव देऊन पुन्हा बाजारात आणण्यात आले आणि त्यानंतर इतिहास घडला.

लोकप्रियतेतून पैसा सर्वांना, पण गीतकार मात्र रिकाम्या हाताने

या गाण्यामुळे गायक, संगीतकार आणि म्युझिक कंपनीला मोठा आर्थिक फायदा झाला. मात्र जहीर आलम यांच्या वाट्याला अत्यंत किरकोळ मानधन आले. एवढे लोकप्रिय गीत लिहूनही त्यांची गरिबी दूर झाली नाही, ही खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती.

एम्प्रेस मिलमध्ये काम करणारे जहीर भाई मिल बंद पडल्यानंतर आर्थिक संकटात सापडले. साहित्य आणि गीतलेखनाची प्रतिभा असूनही त्यांना स्थैर्य मिळाले नाही. मुंबईत संगीतकार नौशाद यांच्यासह अनेक मान्यवरांना त्यांनी भेटी दिल्या, पण त्यातून फारसा फायदा झाला नाही.

एका चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेले गाणे प्रचंड गाजले. मात्र चित्रपटातील इतर गाणी एका नामवंत गीतकाराची असल्याने, “गीतकार म्हणून फक्त माझेच नाव जाईल,” अशी अट घालण्यात आली. अखेर निर्मात्याने जहीर भाईंना केवळ तीन हजार रुपये दिले आणि त्यांचे गीत दुसऱ्याच्या नावावर प्रदर्शित झाले.

छोट्या घरात मोठा माणूस

जहीर आलम यांच्या साधेपणाचा अनुभव त्यांना भेटलेल्या अनेकांनी घेतला. मोमीनपुरातील अरुंद गल्लीत असलेल्या त्यांच्या छोट्याशा घरात बसायलाही जागा नव्हती. पाहुण्यांसाठी ते समोरच्या परिचिताच्या घरी बसण्याची व्यवस्था करीत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही पाहुणचारात मात्र त्यांनी कधी कमी पडू दिले नाही. निघताना स्वतःची सायकल घेऊन पाहुण्यांना मुख्य रस्त्यापर्यंत सोडायला येणारे जहीर भाई मनाने मात्र अत्यंत श्रीमंत होते.

शब्दांतून उमटलेली वेदना

त्यांच्या अनेक रचनांमध्ये त्यांच्या आयुष्याची वेदना उमटत असे. त्यांच्या एका गीतातील ओळी आज विशेष हळव्या वाटतात —
“शहर का मौसम ठीक नहीं है,
लौट चलो अब गाँव…”
आज जहीर आलम खऱ्या अर्थाने अखेरच्या प्रवासाला निघून गेले आहेत. मात्र त्यांच्या शब्दांचा आवाज कायम जिवंत राहील.

Web Title : 'तुम तो ठहरे परदेसी' के गीतकार जहीर आलम का निधन, गरीबी में जीवन.

Web Summary : प्रसिद्ध गीत 'तुम तो ठहरे परदेसी' के गीतकार जहीर आलम का निधन गरीबी में हो गया। गाने की सफलता से अन्य लोग अमीर बने, लेकिन वे आर्थिक रूप से संघर्ष करते रहे। नागपुर के साहित्यिक जगत में उनकी मौत पर शोक है।

Web Title : ‘Tum To Thahre Pardesi’ lyricist Zaheer Alam passes away in poverty.

Web Summary : Zaheer Alam, lyricist of the famous song ‘Tum To Thahre Pardesi,’ died in poverty despite his song's massive success. The song made others rich, but he remained financially struggling. His death is mourned in Nagpur's literary circles.

टॅग्स :nagpurनागपूर