Robert Kiyosaki Global Economy Crash Prediction: 'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि दिग्गज गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी हे त्यांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यांमुळे आणि बाजार कोसळण्याबाबतच्या भाकितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कियोसाकी यांनी पुन्हा एकदा २०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर असल्याचा मोठा इशारा दिलाय.
रॉबर्ट कियोसाकी यांचा नवीन इशारा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये कियोसाकी यांनी म्हटलंय की, "सर्वात यशस्वी गुंतवणूकदार तोच असतो जो भविष्य पाहू शकतो." त्यांनी स्वतःचं उदाहरण देताना सांगितले की, १९६५ मध्ये जेव्हा ते १८ वर्षांचे होते, तेव्हापासूनच त्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. आज २०२६ मध्ये चांदी ही त्यांच्या सर्वोत्तम गुंतवणुकींपैकी एक ठरली आहे.
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
"तुम्हाला भविष्यात काय दिसत आहे? नफा मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींत गुंतवणूक करत आहात?" असा प्रश्न देखील त्यांनी गुंतवणूकदारांना विचारला. कियोसाकी यांच्या मते, २०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घसरण होणार आहे. जे लोक भविष्याचा अंदाज घेऊन सोनं, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करत आहेत, त्यांच्यासाठी ही स्थिती फायद्याची ठरेल, मात्र इतरांसाठी ही वाईट बातमी असू शकते.
कियोसाकी केवळ भीती दाखवतात?
बाजार तज्ज्ञांच्या मते, रॉबर्ट कियोसाकी हे वारंवार गुंतवणूकदारांना घाबरवणारी भाकितं करत असतात. याआधीही त्यांनी अनेकदा मार्केट क्रॅश होण्याचे दावे केले आहेत, परंतु त्यापैकी केवळ काहीच खरे ठरले आहेत. ते जवळपास दरवर्षी अशा प्रकारची मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवत असतात.
गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत कियोसाकींचे पसंतीचे पर्याय
रॉबर्ट कियोसाकी यांनी अनेकदा पुनरुच्चार केला आहे की, २०२६ च्या संभाव्य आर्थिक घसरणीच्या काळात सोनं, चांदी, बिटकॉइन आणि एथेरियम यांसारख्या पर्यायांच्या किमतीत मोठी तेजी येईल. गुंतवणूकदारांनी या काळात मोठी कमाई करण्यासाठी या पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला ते सातत्यानं देत असतात. त्यांच्या मते, ही घसरण अशा लोकांसाठी मोठी संधी असेल जे आज योग्य पाऊल उचलतील.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
