Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 11:51 IST2026-05-11T11:12:22+5:302026-05-11T11:51:02+5:30
Gold Silver Price Today: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेलाचे संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे डॉलर वधारला आणि त्याचा परिणाम म्हणून 'एमसीएक्स'वर (MCX) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.

सकाळी ९:१० च्या सुमारास, एमसीएक्सवर सोन्याचा जूनचा वायदा ०.१०% नी घसरून १,५२,३७६ रुपये प्रति १० ग्रॅम वर होता, तर चांदीचा जुलैचा वायदा ०.६४% च्या वाढीसह २,६३,५९९ रु. प्रति किलो वर व्यवहार करत होता.

कच्च्या तेलाचा बेंचमार्क असलेल्या 'ब्रेंट क्रूड'च्या किमतीत ५% वाढ होऊन ती प्रति बॅरल १०५ डॉलरच्या पार गेल्याने डॉलर इंडेक्स ०.२०% नी वधारला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिका-इराण यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याजदरात कोणतीही कपात करणार नाही, अशा अपेक्षा बळावल्या आहेत. प्रदीर्घ काळ उच्च राहणारे व्याजदर सोन्यासारख्या गुंतवणूक पर्यायासाठी नकारात्मक मानले जातात.

अमेरिका आणि इराणमधील तणाव हा सोने तसेच शेअर बाजारासाठी मोठा अडथळा ठरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांततेचा प्रस्ताव 'अस्वीकार्य' असल्याचे सांगत तो नाकारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना संबोधित करताना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केलं. या वर्षात सोने-चांदी खरेदी करू नका, असाही सल्ला पीएम मोदी यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय घडामोडी आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
















