मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 10:52 IST2026-05-10T10:51:11+5:302026-05-10T10:52:38+5:30
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरुद्ध मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे, ज्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानशी जोडलेले आहेत.

फोटो - ndtv.in
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरुद्ध मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे, ज्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानशी जोडलेले आहेत. पोलिसांनी सिटी सेंटरमधील कैलाश विहार येथील एका हॉटेलवर छापा टाकून चार सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. हॉटेलच्या खोलीतून चालवल्या जाणाऱ्या या नेटवर्कद्वारे देशभरात फसवणूक केली जात होती आणि फसवणुकीची रक्कम 'म्यूल बँक' खात्यांमार्फत परदेशात पाठवली जात होती.
अटक करण्यात आलेले आरोपी मुरैना आणि धौलपूर येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारीविरुद्धच्या लढाईत पोलिसांची ही कारवाई मोठं यश मानलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी 'हॉटेल एचजी'च्या एका खोलीचं रूपांतर कंट्रोल रूममध्ये केलं होतं. येथून लॅपटॉप आणि १२ फोनच्या माध्यमातून देशभरात फसवणुकीचं नेटवर्क चालवलं जात होतं. आरोपी बराच काळ या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून होते आणि सतत संशयास्पद हालचालींमध्ये करत होते.
पाकिस्तान कनेक्शनचा खुलासा
हॉटेलच्या खोलीत थांबलेल्या तरुणांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती एसएसपी धर्मवीर सिंह यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने छापा टाकून घटनास्थळावरून चार तरुणांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत सर्वांनी सायबर फसवणुकीत सामील असल्याची कबुली दिली. तपासात असं समोर आलं की, आरोपींच्या फोनवर पाकिस्तानच्या +92 या कंट्री कोड असलेल्या नंबरवरून सातत्याने व्हॉट्सॲप कॉल्स आणि मेसेज येत होते. पाकिस्तानात बसलेली एक व्यक्ती त्यांना फसवणुकीचे पैसे कोणत्या खात्यात पाठवायचे आणि पुढे कोणत्या खात्यात ट्रान्सफर करायचे, याचे निर्देश देत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गँग सर्वसामान्य लोकांना आमिष दाखवून त्यांच्या नावावर बँक खाती ओपन करत असे आणि ती खाती भाड्याने घेऊन त्यात फसवणुकीची रक्कम मागवत असे. स्वतःच्या खात्यात थेट पैसे न घेता, 'म्यूल' खात्यांद्वारे रक्कम गोळा करून ती परदेशात पाठवली जात होती.
फोन, एटीएम कार्ड, पासबुक, चेकबुक जप्त
पोलिसांनी हॉटेलच्या खोलीतून लॅपटॉप, अनेक फोन, एटीएम कार्ड, पासबुक आणि अनेक चेकबुक जप्त केले आहेत. आरोपींची चौकशी सुरू असून आतापर्यंत किती कोटींची रक्कम परदेशात पाठवण्यात आली आहे, याचा शोध घेतला जात आहे. एसएसपी धर्मवीर सिंह यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या नेटवर्कशी संबंधित इतर लोकांचाही शोध घेतला जात असल्याचं सांगितलं.