Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:35 IST2026-05-11T12:33:23+5:302026-05-11T12:35:31+5:30
West Bengal Politics: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी राजकीयदृष्ट्या एकाकी पडताना दिसत आहेत. राज्यातील इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि डाव्या आघाडीने ममता बॅनर्जींसोबत युती करण्यास स्पष्ट नकार दिला. निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला असतानाच, मित्रपक्षांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ममता बॅनर्जींच्या जखमेवर मीठ चोळले गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी आता स्वतंत्रपणे आपली वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. तृणमूल काँग्रेससोबत गेल्यामुळे आपल्या हक्काच्या मतांचे नुकसान होत असल्याचे या दोन्ही पक्षांचे मत बनले आहे. काँग्रेस नेत्यांच्या मते, तृणमूल काँग्रेसची कार्यपद्धती आणि राज्यातील भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जींसोबत राहिल्यास काँग्रेसलाही त्याचा फटका बसू शकतो. दुसरीकडे, डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच तृणमूलच्या हिंसक राजकारणावर टीका केली. पराभवानंतर आता ममता बॅनर्जींना साथ देण्याऐवजी आपला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय डाव्यांनी घेतला आहे. मोहम्मद सलीम यांच्या नेतृत्वाखालील सीपीएमनेही ममता बॅनर्जी यांची विनंती पूर्णपणे फेटाळून लावली. भाजपविरोधातील लढ्यात तृणमूल काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे कदापि शक्य नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, एकीकडे भारतीय जनता पक्ष बंगालमध्ये आपली पाळेमुळे घट्ट करत आहे, तर दुसरीकडे ममता बॅनर्जींचे जुने मित्र त्यांना सोडून जात आहेत. राष्ट्रीय राजकारणात 'इंडिया' आघाडीचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ममता बॅनर्जींसाठी त्यांच्या स्वतःच्या राज्यात झालेली ही कोंडी चिंतेची बाब ठरत आहे.
काँग्रेस आणि डाव्यांच्या या भूमिकेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. विरोधकांची मते विभागली जाण्याचा फायदा भाजपला मिळू नये, यासाठी ममता बॅनर्जींना पुन्हा एकदा नवीन रणनीती आखावी लागणार आहे. मात्र, सध्या तरी ममता बॅनर्जी या राजकीय मैदानात एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.