जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:35 IST2026-05-11T13:33:56+5:302026-05-11T13:35:12+5:30

आपल्या कारकिर्दीत त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचं रूपडंच एकदम पालटून टाकलं हे तर खरंच, पण आपला देश फक्त तेल उत्पादक देश म्हणूनच ओळखला जाणार नाही, याची गेल्या अनेक वर्षांपासून ते काळजी घेत आहेत.

Around the world: Mohammed bin Zayed Al Nahyan was a 'waiter' in a hotel before becoming UAEs president! | जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!

जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!

संयुक्त अरब अमिरातीचेराष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान सध्या जगभरात गाजताहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचं रूपडंच एकदम पालटून टाकलं हे तर खरंच, पण आपला देश फक्त तेल उत्पादक देश म्हणूनच ओळखला जाणार नाही, याची गेल्या अनेक वर्षांपासून ते काळजी घेत आहेत. तेल उत्पादक संघटना 'ओपेक 'पासून अंतर ठेवून त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की 'आमचं भवितव्य फक्त तेलावर अवलंबून नाही. प्रगतीच्या दिशेनं जाणारा देश म्हणून जगाला आमची दखल घ्यावीच लागेल!'

२०२२मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाचे बदल केले. देशाचा 'पर्सनल लॉ' बदलला. घटस्फोट, कस्टडी आणि वारसाहक्कात महिलांना अधिकार दिले. कामगार कायद्यात बदल करून 'निश्चित कालावधी'चे करार अनिवार्य करण्यात आले. सध्या 'एआय'चाही ते मोठ्या प्रमाणावर वापर करताहेत. 

२०२८ पर्यंत तब्बल ५० टक्के सरकारी काम एआयकडून हाताळलं जाईल. प्रशासकीय कारभार करताना एआय फक्त विश्लेषणच करणार नाही, तर निर्णयही घेईल! असं करणारा यूएई हा जगातील पहिला देश असेल!

आपल्या देशाला उंचीवर नेण्यासाठी त्यांनी काय काय केलं, याबाबतच्या त्यांच्या वैयक्तिक गोष्टीही त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर चर्चिल्या जाताहेत. ते १४ वर्षाचे असताना त्यांचे वडील शेख झायेद यांनी त्यांना आपली राजेशाही ओळख लपवून मोरोक्कोला शिक्षणासाठी पाठवलं. सामान्यांप्रमाणे जगण्याचा आणि कठोर जीवनाचा अनुभव त्यांना घेता यावा, यासाठी घेतलेला हा निर्णय होता.

मोरोक्कोमध्ये शिक्षण घेताना त्यांनी आपलं नाव बदलून 'हसन' ठेवलं होतं, जेणेकरून कुणी त्यांना ओळखू शकणार नाही. तिथे असताना स्वतःचं जेवण ते स्वतः बनवत होते आणि कपडेही स्वतः धूत होते. सर्वसामान्य लोकांचं जीवन आणि संघर्ष जवळून समजून घेता यावा यासाठी एका हॉटेलमध्ये चक्क वेटर म्हणूनही त्यांनी काम केलं.

शेख मोहम्मद यांनी ब्रिटनमधील प्रतिष्ठित रॉयल मिलिटरी अकॅडमी सँडहर्स्टमधून प्रशिक्षण घेतलं आणि पासआउट झाल्यानंतर ते यूएईच्या सैन्यात सामील झाले. येमेन युद्धात त्यांनी आपल्या पुतण्याला थेट फ्रंटलाइनवर पाठवलं, जो आज युद्धामुळे व्हीलचेअरवर आहे.

२००४ मध्ये क्राउन प्रिन्स झाल्यानंतर त्यांनी कायद्यांची स्थिती बदलली. संसदेत ५० टक्के महिला आरक्षण, शंभर टक्के विदेशी मालकी हक्क आणि गोल्डन व्हिसा यांसारख्या निर्णयांनी यूएईला त्यांनी जागतिक गुंतवणुकीचं केंद्र बनवलं. २००४ ते २०२२ दरम्यान त्यांचे भाऊ शेख खलिफा बिन झायेद राष्ट्राध्यक्ष होते, तरी प्रत्यक्ष सत्ता आणि कूटनीती क्राउन प्रिन्स असताना शेख मोहम्मदच सांभाळत होते.

२०१५ मध्ये त्यांनी म्हटलं होतं की, 'शेवटच्या तेलाच्या बॅरलवर यूएई शोक नाही तर उत्सव साजरा करेल!' प्रथम लष्करी कमांडर, नंतर क्राउन प्रिन्स आणि पुढे राष्ट्राध्यक्ष होईपर्यंत त्यांच्या निर्णयांनी यूएईचा केवळ कायापालटच केला नाही, तर आखाती देशांमधील बदलांनाही त्यांनी गती दिली. त्यामुळेच शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याकडे अनेकांचं लक्ष आहे.

Web Title : UAE के राष्ट्रपति शेख मोहम्मद: वेटर से विश्व नेता तक का सफर

Web Summary : राष्ट्रपति बनने से पहले शेख मोहम्मद ने वेटर के रूप में काम किया, कठिनाइयों का अनुभव किया। उन्होंने यूएई कानूनों में सुधार किया, महिलाओं को सशक्त बनाया, एआई को अपनाया, तेल से परे प्रगति का लक्ष्य रखा। उनके नेतृत्व ने यूएई को वैश्विक निवेश केंद्र में बदल दिया।

Web Title : UAE President Sheikh Mohammed: From Waiter to World Leader

Web Summary : Before presidency, Sheikh Mohammed worked as a waiter, experienced hardship. He reformed UAE laws, empowered women, embraced AI, aiming for progress beyond oil. His leadership transformed the UAE into a global investment hub.