ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:44 IST2026-05-11T12:38:30+5:302026-05-11T12:44:25+5:30
वनविभागाच्या बीट सुरक्षा चौकीजवळच पशुपक्ष्यांसाठी एका टबमध्ये पिण्यासाठी पाणी ठेवले आहे. तिथे हा बिबट्या पाणी पिताना एका व्यक्तीला दिसला.

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
ठाणे : ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत वागळे इस्टेट, हनुमाननगर भागातील जनरल मुस्लीम कब्रस्तान वनविभागाच्या सुरक्षा चौकीजवळ प्लास्टिकच्या टबमधील पाणी पिणाऱ्या बिबट्याचा व्हिडीओद्वारे व्हायरल झाला आहे. या भागात बिबट्याचा संचार स्पष्ट झाल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हनुमान नगर येथे जनरल मुस्लीम कब्रस्तान वनविभागाच्या बीट सुरक्षा चौकीजवळच पशुपक्ष्यांसाठी एका टबमध्ये पिण्यासाठी पाणी ठेवले आहे.
उन्हाच्या काहिलीमुळे बिबट्या पाण्याच्या शोधात हनुमाननगर भागात आल्याचे रविवारी पहाटे पावणे १ ते २ वाजण्याच्या दरम्यान आढळले. तो पाणी पिताना दिसल्यानंतर एका रहिवाशाने त्याचा ४० ते ४५ सेकंदांचा व्हिडीओ मोबाइलमध्ये चित्रीत केला.
In Hanuman Nagar, Wagle Estate, #Thane, the leopard came inside the gate of the mama bhanje dargah to drink water Video Viral.#Mumbaipic.twitter.com/AjuPOvk5pi
— Siraj Noorani (@sirajnoorani) May 10, 2026
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आठवड्यापूर्वी असाच एक बिबट्या कैलासनगर भागातही आढळला होता. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
बिबट्या दर्शनानंतर परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या राखीव वनक्षेत्राचाच हा भाग आहे. हे क्षेत्र मामा-भाचे डोंगर परिसराच्या पायथ्याला आहे. राखीव वनक्षेत्राच्या या भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे.
रमाकांत मोरे (परिमंडळ वन अधिकारी, येऊर, ठाणे)