'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:08 IST2026-05-11T12:01:03+5:302026-05-11T12:08:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा बाजारावरील दबावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना तेल, गॅसचा वापर कमी करण्याचे आणि सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या आवाहनावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. "निवडणूक संपताच सरकारला संकट आठवू लागले आहे, पण खरं तर देशासाठी सर्वात मोठे संकट हे भाजपच आहे," अशा शब्दांत अखिलेश यांनी तोफ डागली आहे.
"प्रचार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने का नाही केला?"
पंतप्रधानांच्या आवाहनाचा समाचार घेताना अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी विचारले की, "जर देशाला ऊर्जेची इतकीच चणचण होती, तर भाजपने निवडणुकीच्या काळात हजारो चार्टर्ड विमानांनी प्रवास का केला? भाजप नेत्यांनी त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रचार का केला नाही? त्यावेळी हे विमान इंधनावर चालत नव्हते की पाण्यावर?" सर्व निर्बंध फक्त सामान्य जनतेसाठीच का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सोन्याच्या खरेदीवरून भाजपवर निशाणा
पंतप्रधानांनी जनतेला सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. यावर अखिलेश म्हणाले की, "जनता तर महागाईमुळे आधीच दीड लाख रुपये तोळ्याचे सोने खरेदी करू शकत नाहीये. हे अपील पंतप्रधानांनी आपल्याच भ्रष्ट भाजप नेत्यांना करायला हवे, जे आपली काळी कमाई सोन्यात रूपांतरित करत आहेत. मग ते लखनऊ असो किंवा अहमदाबाद, सगळीकडे हेच सुरू आहे."
चुनाव ख़त्म होते ही, ‘संकट’ याद आ गया!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) May 11, 2026
दरअसल देश के लिए ‘संकट’ सिर्फ़ एक है और उसका नाम है : ‘भाजपा’
इतनी सारी पाबंदियां लगानी पड़ीं तो ‘पंच ट्रिलियन डॉलर की जुमलाई अर्थव्यवस्था’ कैसे बनेगी? लगता है भाजपा सरकार के हाथ से लगाम पूरी तरह छूट गयी है। डॉलर आसमान छू रहा है और देश का… pic.twitter.com/2f8utdxbLR
"परराष्ट्र धोरणात सरकार अपयशी"
देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीला भाजपचे चुकीचे परराष्ट्र धोरण जबाबदार असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. "भारताच्या पारंपारिक 'अलिप्ततावादी' धोरणापासून बाजूला होऊन काही विशिष्ट गटांच्या दबावाखाली चालल्यामुळे आज देशाला महागाई आणि बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. भाजपचे परराष्ट्र आणि गृह धोरण दोन्ही पूर्णपणे कोलमडले आहे," अशी टीका त्यांनी केली.
देशात भीतीचे वातावरण पसरवू नका!
अखिलेश यादव पुढे म्हणाले की, "सरकारचे काम संसाधनांचे नियोजन करून देशाला संकटातून बाहेर काढणे असते, अफवा किंवा भीती पसरवणे नाही. अशा आवाहनांमुळे बाजारात मंदी आणि महागाईची भीती निर्माण होईल, ज्यामुळे जनतेत अस्वस्थता वाढेल. जर तुम्हाला सरकार चालवता येत नसेल, तर आपले अपयश मान्य करा, देशाला उद्ध्वस्त करू नका."