शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 18:21 IST2026-05-10T18:09:52+5:302026-05-10T18:21:55+5:30
विजय यांची एकूण घोषित संपत्ती ६२४ कोटी रुपये एवढी आहे... विशेष म्हणजे, विजय यांनी कुठल्याही म्युच्युअल फंड, बाँड्स किंवा डिबेंचर्समध्ये गुंतवणूक केलेली नाही....

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री जोसेफ विजय अथवा थलापती विजय, यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या एकूण मालमत्तेचा तपशील दिला आहे. हा तपशील कुणालाही चकित करणारा आहे.

विजय यांची एकूण घोषित संपत्ती ६२४ कोटी रुपये एवढी आहे. मात्र, एवढी संपत्ती असतानाही, त्यांची शेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूक, या संपत्तीच्या तुलनेत फारच कमी आहे. ही आश्चर्याची गोष्ट आहे.

त्यांच्या पोर्टफोलिओचा विचार करता, विजय यांनी शेअर बाजारापेक्षाही 'मुदत ठेवी' (FD) आणि बँक बॅलन्सवर अधिक भर दिला आहे.

विजय यांच्या शेअर पोर्टफोलिओसंदर्भात बोलायचे झाल्यास, यामध्ये सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कंपन्यांमध्ये त्यांनी केवळ १९.३७ लाख रुपयेच गुंतवले आहेत. हे त्यांच्या एकूण संपत्तीच्या ०.०४ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

त्यांनी 'जयनगर प्रॉपर्टीज'च्या शेअरमध्ये १९.०३ लाख, 'सन पेपर मिल्स'च्या शेअरमध्ये २५ हजार आणि 'इंडियन ओव्हरसीज बँक' (IOB) या सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये केवळ ९,६०० रुपयांचीच गुंतवणूक केली आहे.

विशेष म्हणजे, विजय यांनी कुठल्याही म्युच्युअल फंड, बाँड्स किंवा डिबेंचर्समध्ये गुंतवणूक केलेली नाही. यावरून, विजय बाजारात कुठल्याही प्रकारची जोखीम घेत नाहीत, हे स्पष्ट होते.

प्रतिज्ञापत्रातील सर्वात थक्क करणारा विषय म्हणजे, जोसेफ विजय यांचे बँक बॅलन्स. विजय यांच्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या साळीग्रामम शाखेतील एका सामान्य बचत खात्यात (Savings Account) तब्बल २१३.३६ कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम त्यांच्या एकूण संपत्तीच्या एक तृतीयांश पेक्षाही अधिक आहे.

याव्यतिरिक्त, त्यांनी विविध बँकांमध्ये १०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी (FD) केल्या आहेत. यात ॲक्सिस बँकेत ४० कोटी, आयओबीमध्ये २५ कोटी, एचडीएफसीमध्ये २० कोटी तर एसबीआयमध्ये १५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवीचा अथवा FD चा समावेश आहे.

याशिवाय विजय यांच्याकडे, १.२० कोटींचे सोने, १५ लाख रुपयांची चांदी आणि १३.५२ कोटींचे कार कलेक्शन असून, २२० कोटींची अचल संपत्ती आहे. महत्वाचे म्हणजे, २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी त्यांचे घोषित वार्षिक उत्पन्न ₹१८४.५३ कोटी एवढे होते.

CM जोसेफ विजय...
















