पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 19:22 IST2026-05-10T19:21:32+5:302026-05-10T19:22:56+5:30
पाकिस्तानात सुरक्षा चौकीवर करण्यात आलेल्या भीषण हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
Pakistan Blast: दहशतवाद्यांच्या आत्मघाती स्फोटानेपाकिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढवला असून, यात बड्या अधिकाऱ्यांसह १६ जवान ठार झाले आहेत. बन्नू जिल्ह्यातील एका पोलीस चौकीला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या आत्मघातकी हल्ल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. इत्तेहाद-उल-मुजाहिद्दीन पाकिस्तान या नवीन दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
ड्रोन आणि स्फोटकांचा वापर
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा १०० हून अधिक दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान सीमेजवळील बन्नू येथील पोलीस चौकीवर हल्ला केला. सुरुवातीला एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली गाडी चौकीला धडकवली. या भीषण स्फोटानंतर सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्यात दहशतवाद्यांनी लहान ड्रोनचाही वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पत्त्यासारखी कोसळली इमारत
स्फोट इतका भीषण होता की, पोलीस चौकीची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. काही जवान गोळीबारात शहीद झाले, तर काही ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने मोठी मोहीम राबवून ढिगाऱ्याखालून जवानांचे मृतदेह बाहेर काढले. जखमी झालेल्या इतर जवानांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शस्त्रास्त्रांची लूट आणि अपहरण
हल्ला केल्यानंतर दहशतवादी पळून जाताना चौकीतील मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही सोबत घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात लष्कराने मोठी शोधमोहीम राबवली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
अफगाणिस्तानवर आरोप
या भीषण हल्ल्याचा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादी पाकिस्तानला लक्ष्य करत आहेत. या दहशतवाद्यांना बाहेरून पाठबळ मिळत आहे, असा थेट आरोप झरदारी यांनी केला. तसेच, दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.