मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 19:43 IST2026-05-10T19:43:03+5:302026-05-10T19:43:30+5:30
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून मातृदिनाचा आनंद 'मातम'मध्ये बदलला आहे.

मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
अमरावती: एकीकडे अवघं जग रविवारी 'मातृदिन' साजरा करत आईच्या मायेचा गौरव करत होतं, तर दुसरीकडे अमरावतीमध्ये एका भीषण दुर्घटनेने तीन कुटुंबांतील मातांची कूस कायमची उजाड केली. रील बनवण्याच्या आणि पोहण्याच्या नादात चार कोवळ्या मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून मातृदिनाचा आनंद 'मातम'मध्ये बदलला आहे.
डब्बा पार्टीचा आनंद ठरला शेवटचा
खोलापुरी गेट पोलिस ठाणे परिसरातील ८ ते ९ मुले, मुली रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या धातखेडा तलावावर 'डब्बा पार्टी'साठी गेले होते. दुपारी जेवण आटोपल्यानंतर उत्साहाच्या भरात काही मुले रील बनवण्यासाठी आणि पोहण्यासाठी पाण्यात उतरली. याच दरम्यान एक मुलगा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेली युवती आणि इतर दोन मुलेही एकामागून एक खोल पाण्यात ओढली गेली. पाहता पाहता चौघांचाही जलसमाधी मिळाली.
क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले
घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रोशन शिरसाठ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून चौघांनाही बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मृतांमध्ये सोनाली नरेंद्र जोशी (१६), आदित्य नरेंद्र जोशी (१२), पायल बबलू पंडित (२१) आणि यश गजानन काकणे (१३) यांचा समावेश आहे.
मातांचा टाहो अन् स्वप्नांची राखरांगोळी
ज्या मातांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहिली होती, त्यांच्यासमोर त्यांच्या काळजाच्या तुकड्यांचे मृतदेह आले, तेव्हा उपस्थितांच्या काळजाचेही पाणी झाले. मातृदिनी आपल्या मुलांकडून शुभेच्छा मिळण्याऐवजी त्यांच्या निधनाची वार्ता ऐकण्याचे दुर्दैव या मातांच्या नशिबी आले. रील बनवण्याच्या वेडापायी चार हसत्या-खेळत्या संसारांची राखरांगोळी झाली आहे.