सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 18:07 IST2026-05-10T18:00:00+5:302026-05-10T18:07:34+5:30
West Bengal Election: तृणमूलच्या बडतर्फ प्रवक्त्याने मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे कौतुक करत आभार मानले आहेत.

सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Riju Dutta on Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता पक्षात अंतर्गत वाद सुरु झाला आहे. पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केलेले प्रवक्ते ऋजू दत्ता यांनी आता थेट नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची स्तुती केल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुवेंदू अधिकारी नसते तर ५००० तृणमूल कार्यकर्त्यांची हत्या झाली असती, असा खळबळजनक दावा दत्ता यांनी केला आहे.
सुभेंदु अधिकारी नसते तर....
ऋजू दत्ता यांनी एएनआयशी बोलताना सुवेंदू अधिकारी यांच्या संयमाचे कौतुक केले. "भारताच्या राजकीय इतिहासात ममता बॅनर्जी यांचे नाव मोठे असेलच, पण सुवेंदू अधिकारी यांची बाजू वेगळी आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ६ मे रोजी सुभेंदु यांच्या पीएची हत्या करण्यात आली. जर त्या रात्री सुवेंदू अधिकारी यांनी सूड घेण्याची भाषा केली असती, तर बंगालमध्ये किमान ५,००० तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या झाली असती. मात्र, त्यांनी अत्यंत संयम दाखवत कोणालाही कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आणि ५,००० कार्यकर्त्यांचे प्राण वाचवले," असं ऋजू दत्ता म्हणाले.
आय-पॅकवर निशाणा
ऋजू दत्ता यांनी ममता आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही टीकेची झोड उठवली. "बाहेरच्या संस्थेने संपूर्ण पक्षावर ताबा मिळवला आहे, याची जबाबदारी दिदी आणि अभिषेक यांनी घ्यायला हवी," असे ते म्हणाले.
बड्या नेत्यांमध्येही धुसफूस
केवळ ऋजू दत्ताच नव्हे, तर इतरही अनेक बड्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी क्रीडा मंत्री मनोज तिवारी यांनी अरूप विश्वास यांच्यावर कामात अडथळे आणल्याचा आरोप केला. कोलकात्याचे उपमहापौर अतीन घोष यांनी पक्षाच्या या अवस्थेला थेट अभिषेक बॅनर्जी यांची कार्यपद्धती जबाबदार असल्याचे म्हटले. रत्ना चॅटर्जी यांनी निवडणुकीच्या काळात नेतृत्वाशी संवाद साधता आला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
शिस्तभंगाची कारवाई आणि दत्तांचे प्रत्युत्तर
पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसने ऋजू दत्ता यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले. त्यावर दत्ता यांनी संताप व्यक्त केला असून, "मी फक्त खरं सांगितले बोललो म्हणून माझ्यावर ही कारवाई करण्यात आली. मी १३ वर्षे पक्षाला दिली, स्वतःच्या ताकदीवर पद मिळवले. मला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यापूर्वीच निलंबित करण्याचे ठरले होते. पण मी वचन देतो, मी पुन्हा येईन," असं म्हटलं.