धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 16:33 IST2026-05-10T16:32:29+5:302026-05-10T16:33:02+5:30
Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान,बंगळुरूच्या बाहेरील भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रम स्थळापासून जवळच स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी सुरक्षा दलांना खबरदारी घ्यावी लागली.

धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान,बंगळुरूच्या बाहेरील भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रम स्थळापासून जवळच स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी सुरक्षा दलांना खबरदारी घ्यावी लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम नियोजित असलेल्या ठिकाणापासून जवळच दोन जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. या जिलेटिनच्या कांड्या कागलीपुराजवळील एका आश्रमाजवळच्या फुटपाथवर सापडल्या. या ठिकाणापासून मोदींच्या सभेचं ठिकाण हे तीन किलोमीटर अंतरावर होते. जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम हाती घेण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान, संशयास्पद साहित्य सापडलं. शोधमोहिमेदरम्यान, फुटपाथच्या शेजारी जिलेटिनच्या दोन कांड्या सापडल्या. त्यानंतर बॉम्बनाशक पथक आणि फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. तसेच सुरक्षा व्यवस्थाही आणखी कडेकोट करण्यात आली.
या घटनेनंतर पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली आहे. तसेच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची सखोल चौकशी केली जात आहे. तसेच या जिलेटिनच्या कांड्या तिथे कशा आल्या. यामागे कुठलंही कटकारस्थान तर नाही ना, याचाही शोध घेतला जात आहे.