लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 17:32 IST2026-05-10T17:32:26+5:302026-05-10T17:32:41+5:30
प्रियकराने आपल्या भावोजीसोबत मिळून हा कट रचला आणि गळा दाबून प्रेयसीची हत्या केली.

लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातून हत्येची एक थरारक घटना समोर आली आहे. लग्नासाठी सतत दबाव टाकत असल्याच्या कारणावरून एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीची निर्घृण हत्या केली. या गुन्ह्यात त्याला त्याच्या बहिणीच्या पतीनेही साथ दिली. हत्येनंतर महिलेचा मृतदेह रेल्वे रुळांच्या कडेला फेकून आरोपी फरार झाले होते. मात्र, गजरौला पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
रेल्वे ट्रॅकवर आढळला होता मृतदेह
७ मे २०२६ रोजी गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानपूर फाटकाजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला असता, ९ मे रोजी तिची ओळख पटली. तनु (२६ वर्ष) असे मृत महिलेचे नाव असून ती फरीदाबाद येथील रहिवासी होती. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिची गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते.
असं रचलं हत्येचं कारस्थान
तनु ही विवाहित होती, मात्र पतीसोबत वाद असल्यामुळे ती त्याच्यापासून वेगळी राहत होती. याच काळात तिची ओळख अमरोहा येथील कामिल या तरुणाशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तनु सतत कामिलकडे लग्नासाठी हट्ट धरत होती, ज्यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी कामिलने आपला भावोजी नाझीर याच्यासोबत मिळून हत्येचा कट रचला.
रेल्वे रुळांच्या कडेला काढला काटा
ठरल्याप्रमाणे, कामिल आणि नाझीर यांनी तनुला गजरौला स्टेशनच्या पुढे एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे त्यांनी तिचा गळा दाबून जीव घेतला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी तिचा मृतदेह तिच्याच ओढणीने झाकून रेल्वे रुळांच्या कडेला फेकून दिला आणि तिथून पळ काढला.
पोलिसांची कारवाई
तनुच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आणि मुख्य आरोपी कामिलसह नाझीरला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून, लग्नाचा दबाव हेच हत्येचे मुख्य कारण असल्याचे सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. पोलीस सध्या याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.