किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 17:14 IST2026-05-10T17:13:56+5:302026-05-10T17:14:26+5:30
Kim Jong-un News: उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन हा त्याच्या विचित्र आणि क्रूर निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, आता किम जोंग उनच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने आपल्या राज्यघटनेत बदल करून एक भयंकर निर्णय घेतला आहे.

किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन हा त्याच्या विचित्र आणि क्रूर निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, आता किम जोंग उनच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने आपल्या राज्यघटनेत बदल करून एक भयंकर निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता जर किम जोंग उनची हत्या झाली किंवा परकीय आक्रमणात देशाची कमांड व्यवस्था नष्ट झाली तर लष्कराला ऑटोमॅटिक अण्वस्त्रांद्वारे प्रतिहल्ला करावा लागेल. त्यासाठी कुठल्याही नेत्याकडून स्वतंत्र आदेश प्राप्त करण्याची आवश्यकता नसेल.
उत्तर कोरियाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर एजन्सीने दिली आहे. हल्लीच अमेरिका आणि इस्राइलने हल्ला करून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांच्या केलेल्या हत्येनंतर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर कोरियाने हा निर्णय घेतला आहे.
उत्तर कोरियाच्या १५ व्या सुप्रीम पीपल्स असेंब्लीची बैठक २२ मार्च रोजी प्योंगयोंग येथे झाली होती. याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. एनआयएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता न्यूक्लियर फोर्सेसवरील नियंत्रण शत्रूच्या हल्ल्यामुळे धोक्यात आले तर ऑटोमॅटिक आणि त्वरित अणुहल्ला केला जाईल. नव्या नियमानुसार किम जोंग उनच्या कमांड सिस्टिमला धोका निर्माण झाल्यास अणुहल्ल्यासाठी कुठल्याही आदेशाची वाट पाहावी लागणार नाही, तसेच आपोआप अणुहल्ला होईल.