ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 19:19 IST2026-05-10T19:18:28+5:302026-05-10T19:19:20+5:30
भारतीय हवाई दलाच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेला जैश-ए-मोहम्मदचा बहावलपूरमधील अड्डा पुन्हा बांधला जात आहे.

ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
७ मे २०२५ ची ती रात्र पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही, जेव्हा भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या चिंधड्या उडवल्या होत्या. मात्र, या कारवाईत उद्ध्वस्त झालेला जैश-ए-मोहम्मदचा बहावलपूरमधील 'मारकज सुभानअल्लाह' हा बालेकिल्ला पुन्हा एकदा उभा राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कंगाल झालेल्या पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारने या दहशतवादी अड्ड्याच्या पुनर्बांधणीसाठी २५ कोटी पाकिस्तानी रुपयांचा निधी दिल्याने भारताच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ब्रह्मोस मिसाईल्स आणि हवाई हल्ल्यांद्वारे जैशच्या या मुख्यालयाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात इमारतीचे मुख्य घुमट आणि लष्करी संरचना जमीनदोस्त झाल्या होत्या. मात्र, ताज्या अहवालानुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये निधी मिळाल्यानंतर मार्च २०२६ पासून येथे बांधकामाचा वेग प्रचंड वाढला आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यात निकामी झालेले भाग दुरुस्त केले जात असून, नवीन इमारतींचे जाळे विणले जात आहे.
लष्कराच्या सुरक्षेत दहशतवाद्यांचे बांधकाम
बहावलपूरमधील हा परिसर आता सामान्य राहिला नसून, त्याला अभेद्य किल्ल्याचे स्वरूप दिले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बांधकामाच्या ठिकाणी पाकिस्तानच्या विशेष सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दहशतवादी ढाचा पुन्हा उभारला जात असताना त्याला अधिकृत लष्करी संरक्षण दिले जाणे, हे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड करणारे आहे.
भारताची चिंता वाढली
बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्य केंद्र आहे, जिथून भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि ड्रोन कारवायांचे नियोजन केले जाते. भारताने याआधीच नूर खान एअरबेस आणि इतर तळांना लक्ष्य करून पाकिस्तानला इशारा दिला होता. आता पुन्हा एकदा हा अड्डा सक्रिय होत असल्याने सीमेवर घुसखोरीचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणा या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
पाकिस्तानचा दुटप्पीपणा कायम
एककीडे जगासमोर शांततेचा आव आणणारा पाकिस्तान पडद्यामागे दहशतवाद्यांना पोसण्यासाठी स्वतःची तिजोरी रिकामी करत आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये बसलेला फटका सहन न झाल्याने आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या मदतीने भारतविरोधी कारवायांना बळ देण्याचे हे कारस्थान असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.