Chanakya Niti: केवळ प्रेम पुरेसे नाही! चाणक्य नीतीनुसार खरा जोडीदार ओळखण्याचे 'हे' निकष महत्त्वाचे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 16:20 IST2026-04-21T16:15:11+5:302026-04-21T16:20:01+5:30
Chanakya Niti for Healthy Relationship: आधुनिक जगात ज्याला आपण 'सोलमेट' म्हणतो, त्याला आचार्य चाणक्य एका 'सक्षम जोडीदाराची' उपमा देतात. चाणक्य म्हणतात की, "ज्याचं घर कलहमुक्त आहे आणि ज्याचा जोडीदार विचारांशी सहमत आहे, त्याच्यासाठी पृथ्वीवरच स्वर्ग आहे."

पर्फेक्ट जोडीदार ही संकल्पना अस्तित्त्वात नाही. कारण पर्फेक्ट कोणीही नसतं. प्रत्येकात कमी अधिक उणिवा असतातच. मात्र जेव्हा व्यक्तीला गुण दोषांसकट स्वीकारले जाते आणि विचारात एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती जोडी परस्परांना पूरक ठरते. यासाठी कोणते गुण जुळवून घेतले पाहिजे, याबाबत आचार्य चाणक्य यांनी केलेले मार्गदर्शन पाहू.

१. जीवनमूल्ये आणि धर्म (Core Values)
आचार्य सांगतात, की तुमच्या नैतिक मूल्यांमध्ये समानता असावी. जर दोन व्यक्तींच्या 'धर्मा'त (म्हणजेच कर्तव्य आणि मूल्ये) तफावत असेल, तर ते घर जास्त काळ टिकू शकत नाही. ज्यांची जीवन जगण्याची तत्त्वे सारखी असतात, तेच संकटात एकमेकांना खंबीर साथ देऊ शकतात. जसे की चुकीच्या गोष्टींना चूक न म्हणता एकाने बरोबर तर दुसऱ्याने चूक म्हणणे, म्हणजे घरात कायम वादाचे प्रसंग उद्भवणार. याउलट तटस्थपणे परिस्थितीचे अवलोकन करून चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारी जोडी चांगला संसार करू शकतात.

२. संवाद शैली (Communication Styles)
चाणक्य म्हणतात, "वाणीमध्ये अमृतासारखा गोडवा असावा." जोडीदाराशी संवाद साधताना केवळ शब्द महत्त्वाचे नसून ते कोणत्या पद्धतीने बोलले जातात, हे महत्त्वाचे आहे. जर दोघांच्या संवाद साधण्याच्या पद्धतीत मेळ नसेल, तर साध्या गोष्टीवरूनही गैरसमज निर्माण होऊ शकतात. एकमेकांप्रती आदर असणे महत्त्वाचे असते. कमी लेखणे, अपमानास्पद बोलणे, चारचौघात मानहानी करणे या गोष्टींमुळे नाते कमकुवत होते. त्याबरोबरच एकमेकांच्या चुका खाजगीत सांगून सुधारणे हे सुद्धा नात्याला पोषक ठरते.

३. वादाचे स्वरूप (Conflict Resolution)
वाद होणे स्वाभाविक आहे, पण चाणक्य नीतीनुसार जोडीदाराने 'संयमी' असणे आवश्यक आहे. एकमेकांचा अपमान न करता तोडगा काढण्याची वृत्ती दोघांमध्ये समान असावी. जोडीदाराने वादाच्या वेळी 'शांत' राहणे हाच नात्याचा खरा पाया आहे. वाद झाले तरी ते जितक्या लवकर संपुष्टात येतील तितक्या लवकर संपवण्याचा दोघांनी प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. जोडीदारात मतभेद असले तर चालतील पण मनभेद असू नये.

४. आयुष्याची उद्दिष्टे (Life Goals)
आचार्य चाणक्यांच्या मते, दोन भिन्न दिशांना तोंड असणारे घोडे रथ ओढू शकत नाहीत. तसेच, जर जोडीदारांची ध्येय (Ambitions) परस्परविरोधी असतील, तर प्रगती खुंटते. भविष्याचे नियोजन आणि ध्येय गाठण्याची जिद्द यात समानता असणे यशासाठी अनिवार्य आहे. करिअर वेगवेगळे असू शकतात पण जीवन ध्येय दोघांचे समान असले तर प्रवास सोपा होतो.

५. आर्थिक दृष्टिकोन (Spending Habits)
चाणक्य नीतीमध्ये 'अर्थ' (पैसा) हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. जर एक जोडीदार काटकसरी असेल आणि दुसरा उधळ्या, तर त्या घरात कधीही लक्ष्मी नांदणार नाही. पैशाचा विनियोग आणि बचतीचे महत्त्व यावर दोघांचे एकमत असणे हीच सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे.

६. अभिरुची आणि आवड (Interests & Hobbies)
दोघांच्या आवडीनिवडी पूर्णपणे सारख्या नसल्या तरी चालतील, पण एकमेकांच्या आवडीचा 'आदर' करणे चाणक्य नीतीत अभिप्रेत आहे. जोडीदाराच्या छंदांना प्रोत्साहन देणे हे प्रगल्भ नात्याचे लक्षण आहे. कारण याच छोट्या छोट्या गोष्टी नात्याचा पाया भक्कम करतात आणि असे नाते टिकते, बहरते आणि घट्ट होत जाते. एकमेकांबरोबरचा प्रवास सुखकर होतो, पण त्यासाठी दोघांची आवश्यक तिथे तडजोड करण्याची तयारी असावी लागते.

















