केवळ Ford नाही; गेल्या ५ वर्षात ‘या’ बड्या ऑटो कंपन्यांनी गुंडाळला गाशा; भारतात ठरल्या फेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 02:03 PM2021-09-12T14:03:57+5:302021-09-12T14:11:18+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बड्या ऑटो कंपन्यांनी भारतातील आपला व्यवसाय बंद केला. लोकप्रियता, दर्जा आणि अधिक किमतीसह अनेक गोष्टींचा यात समावेश होता, असे सांगितले जात आहे.

अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्ड मोटर कंपनीने भारतातील आपल्या दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधील प्रोडक्शन बंद करण्याचा घेतलेला निर्णय भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्राला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेतील दीर्घ काळाच्या संघर्षानंतर उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या सुमारे १० ते १५ वर्षांत जवळपास १५ हजार कोटींचा तोटा सहन केला असल्याचे सांगत आता केवळ विद्यमान ग्राहकांना सेवा, वॉरंटी आणि भागांची उपलब्धता यासारख्या सुविधा मिळत राहतील, असे आश्वासन कंपनीने दिले आहे.

फोर्ड कंपनीच्या या निर्णयानंतर लाखो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे कंपनीने गाशा गुंडाळण्याचा घेतलेला निर्णय यामुळे कर्मचारी चांगलाच कचाट्यात सापल्याचे बोलले जात आहे.

भारतातून आपला गाशा गुंडाळणारी फोर्ड ही पहिली ऑटोमोबाइल कंपनी नाही. याआधी गेल्या काही वर्षांमध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची कार-बाजारपेठ असलेल्या भारतातून आपला व्यवसाय बंद केला आहे. यामध्ये अनेक मोठ्या ब्रँडचा समावेश असून, भारतीय ग्राहकांच्या पसंतीस या कंपन्या पात्र ठरल्या नाही, असे सांगितले जात आहे.

जनरल मोटर्सने भारतामध्ये १९९६ साली Opel ब्रँडसोबत पदार्पण केले होते. यानंतर २००३ मध्ये कंपनी Chevrolet कार ब्रँडला घेऊन आली. अनेक शानदार मॉडल्स असूनही शेवर्लेला भारतामध्ये मोठे यश मिळाले नाही. कंपनी मारुती सुझुकी, ह्युंडाई, महिंद्रा अशा लोकप्रिय कार कंपन्यांसमोर टिकू शकली नाही.

भारतात Chevrolet ला बंद करण्याचा कंपनीचा निर्णय धक्कादायक होता. कारण Chevrolet बंद करण्याच्या काही महिने आधी जनरल मोटर्सच्या सीईओंनी भारतात १ बिलियन डॉलरच्या गुंतवणूकीची घोषणा केली होती. २०१७ मध्ये जनरल मोटर्सने भारतातून निरोप घेतला.

इटलीची पॉप्युलर कार कंपनी Fiat ने जानेवारी २०१९ मध्ये भारतातून आपलं उत्पादन बंद केलं, आणि गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारतातील ऑपरेशन पूर्णपणे बंद केलं. कंपनीने भारतीय बाजारात Fiat Punto, Linea, Punto EVO अशा अनेक शानदार कार लाँच केल्या होत्या.

सन १९९० च्या सुरुवातीला कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला. तथापि, जसजशी स्पर्धा वाढली तसतशी फियाटची कामगिरी खालावली. कारचे डिझाईन, वैशिष्ट्यांचा अभाव आणि कमी मायलेज हे यामागचे कारण होते.

अमेरिकेच्या युनायटेड मोटर्सने भारतात लोहिया ऑटोच्या भागीदारीने आपला व्यवसाय सुरू केला होता. कंपनीने रेनेगेड कमांडो, रेनेगेड स्पोर्ट एस आणि रेनेगेड क्लासिकसह अनेक उत्तम क्रूझर बाईक्स सादर केल्या. त्यांची रचना अगदी वेगळी होती, पण त्यांच्या खराब गुणवत्तेमुळे त्यांच्यावर टीकाही झाली.

युनायटेड मोटर्सचे लक्ष्य रॉयल एनफील्डशी स्पर्धा करण्याचे होते. अखेरीस कंपनीने ऑक्टोबर २०१९ मध्ये भारतीय बाजार सोडला, ज्यामुळे डीलर्समध्ये प्रचंड गोंधळ उडाला. सध्या यूएम आणि फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) यांच्यात कायदेशीर वाद सुरू आहे.

प्रीमियम बाइक लव्हर्ससाठी हार्ले डेव्हिडसनचा भारतातून एक्झिट घेण्याचा निर्णय एक मोठा झटका होता. यूएस-आधारित प्रीमियम बाईक कंपनीने सप्टेंबर २०२० मध्ये भारतातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या बाईक्स खूपच महाग होत्या, ज्यामुळे नगण्य विक्री झाली.

यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला. हार्लेने नंतर भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्प बरोबर करार केला. त्यानुसार, हिरो मोटोकॉर्प आता हार्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींची विक्री आणि सेवा करते.

प्रीमियर ऑटोमोबाइल्स लिमिटेड ही भारतातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक होती. मात्र, विक्री कमी झाल्यामुळे कंपनीला व्यवसाय बंद करावा लागला. कंपनी रिओ आणि पद्मिनी सारख्या कारसाठी सर्वात प्रसिद्ध होती. Premier Padmini लूकच्या बाबतीत Hindustan Ambassador कारप्रमाणेच होती, जी अजूनही मुंबईत टॅक्सी म्हणून वापरली जात आहे. कंपनीने १९४० च्या उत्तरार्धात आपला व्यवसाय सुरू केला होता. तर, डिसेंबर २०१८ मध्ये प्रीमियर दिवाळखोरीत निघाली.

आयशर आणि पोलारिसने मार्च २०१८ मध्ये भारतातील आपला व्यवसाय गुंडाळला. भारतातून बाहेर पडण्यापूर्वी आयशर भारतात पोलारिस मल्टिक्स मॉडेल विकत असे. मात्र, वाढत्या महागाईचा फटका कंपनीला बसला आणि ग्राहकांची संख्या मर्यादित झाली. घसरलेल्या विक्रीमुळे आयशर पोलारिसला अखेर मार्च २०१८ मध्ये कामकाज बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.