उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:49 IST2026-05-19T17:47:13+5:302026-05-19T17:49:04+5:30
Umar Khalid Bail Rejected: प्रत्येक वेळी विनंती केल्यावर अंतरिम जामीन मंजूर केला जाईल, असे होणार नाही, असे नमूद करत कोर्टाने अर्ज फेटाळून लावला.

उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
Umar Khalid Bail Rejected:दिल्ली दंगलीतील मोठ्या कटाशी संबंधित यूएपीए प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते उमर खालिद यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला. कनिष्ठ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर बजाज यांनी उमर खालिद यांची १५ दिवसांच्या अंतरिम जामिनाची विनंती फेटाळून लावली. उमर खालिद यांनी अंतरिम जामिनासाठी दिलेली कारणे योग्य आणि समाधानकारक नव्हती, असे सांगत न्यायालयाने फटकारले.
आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, याचिकेत नमूद केलेली परिस्थिती अंतरिम दिलासा देण्यासाठी पुरेशी कारणे नाहीत. केवळ उमर खालिद आणि इतर आरोपींना यापूर्वी अंतरिम जामीन मंजूर झाला होता. त्यांनी अटींचे कधीही उल्लंघन केले नव्हते, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी विनंती केल्यावर अंतरिम जामीन मंजूर केला जाईल. काकांच्या चेहल्लुमला उपस्थित राहणे आवश्यक नाही. जर नाते इतके जवळचे आणि घट्ट होते, तर उमर खालिदने इतक्या उशिरा नव्हे, तर त्याच्या मृत्यूच्या वेळीच जामिनासाठी अर्ज करायला हवा होता, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
अंतरिम दिलासा देणे योग्य ठरणार नाही
आईच्या शस्त्रक्रियेच्या मुद्द्यावर न्यायालयाने नमूद केले की, उमर खालिदच्या इतर बहिणी तिची काळजी घेऊ शकतात. त्याचे वडीलही तिला मदत करण्यास सक्षम आहेत. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यांनुसार ही शस्त्रक्रिया एक सामान्य प्रक्रिया आहे. अर्जदाराकडून कोणत्याही विशेष मदतीची खरी गरज असल्याचे दिसत नाही. दिलेली कारणे समर्थनीय नाहीत आणि म्हणूनच, अंतरिम दिलासा देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी अंतरिम जामीन अर्जाला विरोध केला
दिल्ली पोलिसांनी अंतरिम जामीन अर्जाला विरोध करताना युक्तिवाद केला की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, त्याचे दूरगामी परिणाम असल्याने उमर खालिदच्या सुटकेचा सार्वजनिक सुव्यवस्था आणि प्रशासनावर परिणाम होऊ शकतो. हा अंतरिम जामीन अर्ज पूर्णपणे अयोग्य, निराधार असून तो फेटाळला गेला पाहिजे. कारण खालिदला अंतरिम दिलासा देण्यासाठी कोणतेही तातडीचे किंवा सबळ कारण नाही.
दरम्यान, काकांच्या निधनानंतर होणाऱ्या चेहल्लुमला उपस्थित राहण्यासाठी आणि २ जून रोजी होणाऱ्या आईच्या शस्त्रक्रियेपूर्वी व नंतर तिची काळजी घेण्यासाठी खालिदने अंतरिम जामिनाची मागणी केली होती. तत्पूर्वी, आरोपीची दीर्घकाळ चाललेली खटल्यापूर्वीची अटक घटनाबाह्य आहे. उमर खालिद आणि गुलफिशा फातिमा यांच्यासह इतर आरोपींना दिलेला जामीन योग्यरित्या ठरवला गेला नव्हता, , असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केल्यानंतर अवघ्या एका दिवसात हा निर्णय आला आहे.