व्हॉट्सॲप युजर्संसाठी धोक्याची घंटा! 'या' अँड्रॉइड फोनवर WhatsApp कायमचं बंद होणार; पाहा तुमचा मोबाईल आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:58 IST2026-04-27T11:35:07+5:302026-04-27T11:58:51+5:30

८ सप्टेंबर २०२६ पासून व्हॉट्सॲप अँड्रॉइड 6.0 पेक्षा जुन्या व्हर्जनला सपोर्ट करणे बंद करेल, यामुळे लाखो वापरकर्त्यांवर परिणाम होणार आहे.

जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. व्हॉट्सॲपने आपल्या प्लॅटफॉर्मसाठी किमान सिस्टम आवश्यकता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता ८ सप्टेंबर २०२६ पासून अँड्रॉइड ६.० पेक्षा जुन्या व्हर्जनसाठी व्हॉट्सॲपचा सपोर्ट पूर्णपणे बंद करणार आहे.

जर तुमचा फोन अँड्रॉइड ५.० किंवा ५.१ या व्हर्जनवर चालत असेल, तर या तारखेनंतर त्या डिव्हाइसवर व्हॉट्सॲप चालणार नाही.

व्हॉट्सॲप सतत नवीन फीचर्स आणत असते, अॅपच्या चांगल्या कामगिरीसाठी ॲप अपडेट करणे आवश्यक असते. मात्र, अँड्रॉइडच्या जुने व्हर्जन आणि कमकुवत हार्डवेअरमुळे हे नवीन फीचर्स व्यवस्थित चालवणे कठीण होऊ शकते. या कारणासाठी कंपनी आता जुन्या व्हर्जनसाठीचा सपोर्ट बंद करत आहे.

भारत, ब्राझील, पाकिस्तान आणि अनेक आशियाई व आफ्रिकन देशांमध्ये लक्षणीय संख्येने वापरकर्ते अजूनही जुने अँड्रॉइड फोन वापरतात. या बदलाचा परिणाम लाखो वापरकर्त्यांवर होऊ शकतो.

व्हॉट्सॲपने प्रभावित वापरकर्त्यांना सूचना पाठवण्यास आधीच सुरुवात केली आहे. ॲप उघडल्यावर, वापरकर्त्यांना एक सूचना दिसेल, ८ सप्टेंबर २०२६ नंतर ही सेवा उपलब्ध राहणार नाही, अशा सूचना यामध्ये दिल्या जातात.

जर तुमच्या डिव्हाइसमध्ये अँड्रॉइड ६.० किंवा त्याहून अधिक व्हर्जन असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमचे व्हॉट्सॲप नेहमीप्रमाणे काम करत राहील. आयफोन आणि आयपॅड वापरकर्त्यांवरही कोणताही परिणाम होणार नाही.

दरम्यान, जर तुमच्या डिव्हाइसमध्ये अँड्रॉइड ५.० किंवा ५.१ किंवा त्यापेक्षा कमी व्हर्जन असेल, तर तुम्ही ते ताबडतोब अपडेट केले पाहिजे. जर तुमच्या फोनवर कोणतेही अपडेट उपलब्ध नसेल, तर नवीन स्मार्टफोन खरेदी करणे हाच एकमेव पर्याय आहे.