भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 20:19 IST2026-04-27T20:13:14+5:302026-04-27T20:19:21+5:30
यासंदर्भात आता खुद्द सरकारनेच खास सल्ला दिला आहे. यामुळे आपले घर तर थंड राहीलच, शिवाय वीज बिल कमी येऊन आपल्या पैशांचीही मोठी बचत होईल.

सध्या उन्हाची तीव्रता अधिकच वाढताना दिसत आहे. या रणरणत्या उन्हात आपले घर थंड राहावे असे सर्वांनाच वाटते. मात्र त्या प्रयत्नांत वीज बिलही भसाभस वाढते आणि टेन्शनही. अनेकदा अधिक थंडावा मिळावा म्हणून लोकAC अगदी १८-२० डिग्रीपर्यंत सेट करतात. यामुळे विजेचा वापर प्रचंड वाढतो. यामुळे योग्य तापमानाची योग्य निवड करणे अत्यंत आवश्यक आहे.

यासंदर्भात आता खुद्द सरकारनेच खास सल्ला दिला आहे. यामुळे आपले घर तर थंड राहीलच, शिवाय वीज बिल कमी येऊन आपल्या पैशांचीही मोठी बचत होईल.

२४ डिग्री सेल्सिअस हे सर्वात आदर्श तापमान - भारत सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी (BEE) नुसार, AC साठी २४ डिग्री सेल्सिअस हे सर्वात आदर्श तापमान आहे. १ जानेवारी २०२० पासून लागू झालेल्या नियमांनुसार, सर्व BEE स्टार रेटिंग असलेल्या एअर कंडिशनर्सचे डिफॉल्ट तापमान २४°C वर सेट करण्यात आले आहे. हे तापमान शरीरासाठीही योग्य आणि वीज बिल कमी करण्यासही मदत करते.

या तापमानावर AC चालवल्यामुळे आपली रूम आवश्यक तेवढी थंड राहते आणि मशीनवरही अधिक भार येत नाही. जर आपण AC खूप कमी तापमानावर चालवला, तर कॉम्प्रेसरला अधिक कार्यक्षमतेने काम करावे लागते. परिणामी वीज अधिक खर्च होते.

रात्रीच्या वेळी किती असावे तापमान? - खरेतर, झोपताना AC चे तापमान २४ डिग्री ठेवणे सर्वात योग्य मानले जाते. अनेकजण रात्री १८-२० डिग्रीवर AC चालवतात. मात्र, यामुळे आरामदायक झोप लागत नाही आणि विजेचे बिलही मोठ्या प्रमाणावर वाढते. तज्ज्ञांच्या मते, २४°C हे सर्वात योग्य आणि किफायतशीर तापमान.

एसी सोबत पंखा चालवणं खरंच किती फायद्याचं? - AC सोबत पंखा चालवल्याने थंड हवा संपूर्ण खोलीत पसरते. यामुळे कमी तापमानावरही अधिक थंडावा मिळतो. खोलीत दमटपणा अधिक असल्यास, 'डीह्युमिडिफायर' वापरणे अधिक फायदेशीर ठरते. कोरड्या हवेमुळे थंडावा अधिक जाणवतो आणि AC वरील लोड कमी होतो.

स्मार्ट AC चा फायदा - आजकाल बाजारात स्मार्ट AC चा ट्रेंड सुरू आहे. यामुळे आपण मोबाईलच्या सहाय्यनेही त्याला नियंत्रित करू शकता. यासोबत 'टायमर' आणि 'ऑटो टेंपरेचर' सारखे फीचर्सदेखील मिळतात. यामुळे आपण झोपण्यापूर्वीही खोली थंड करू शकता. रात्री तापमान आपोआप वाढते. परिणामी विजेची मोठी बचत होते.

















