विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 21:50 IST2026-04-27T21:49:44+5:302026-04-27T21:50:25+5:30
कमाल तापमानात अंशत: घट झाली असली तरी तीन जिल्हे ४६ व तीन जिल्हे ४५ अंशाने तापले आहेत. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र अवकाळीचे सावट तयार झाले असून पारा १ ते ३ अंशाने घसरला आहे.

विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
नागपूर : रविवारी सर्वाधिक तापमानाच्या भीषण उष्णतेने हाेरपळणाऱ्या विदर्भातील सहा जिल्ह्यांचा ताप साेमवारीही कायम हाेता. कमाल तापमानात अंशत: घट झाली असली तरी तीन जिल्हे ४६ व तीन जिल्हे ४५ अंशाने तापले आहेत. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र अवकाळीचे सावट तयार झाले असून पारा १ ते ३ अंशाने घसरला आहे.
रविवारी ४६.९ अंशावर गेलेल्या अकाेल्याच्या तापमानात ०.६ अंशाची घट हाेत साेमवारी ४६.३ अंशाची नाेंद झाली. दुसऱ्या क्रमांकावर असलेले अमरावती तापमान अंशत: घटूनही सर्वाधिक उष्ण शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आले. येथे ४६.६ अंशाची नाेंद झाली. वर्धा शहराने आज ०.१ अंशाची वाढ नाेंदवत १०० वर्षाचा विक्रम माेडित काढला. साेमवारी वर्ध्याचे तापमान ४६.५ अंश नाेंदविण्यात आले, जे १९९६ सालच्या तुलनेत ०.१ अंशाने अधिक आहे. चंद्रपूरचे तापमान ०.२ अंशाने वाढून ४५.२ वर गेले, तर यवतमाळचे ०.८ अंशाने घटून ४५.२ अंशावर आले. नागपूरला ४५ अंशाची नाेंद झाली. नागपूर शहराच्या काही भागात रविवारी हलक्या सरी झाल्या व साेमवारी सायंकाळी ढगांनी गडगडाट केला. मात्र उष्णता कमी करण्यास त्याचा लाभ झाला नाही.
दुसरीकडे पूर्व विदर्भातील गडचिराेली, गाेंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आकाशात अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यात पारा खाली आला आहे. गडचिराेली १.४ अंशाने घटून ४३.२ वर, भंडारा २ अंशाने घटून ४२ वर आणि गाेंदिया येथे ३.४ अंशाची घसरण हाेत पारा ४१ अंशावर खाली आला आहे. वाशिम ४४.४ व बुलढाणा ४३.६ अंशावर तापले आहे.
२८ नंतरच दिलासा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील सहा जिल्ह्यात आणखी २४ तास उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण तयार हाेऊन वादळासह हलका पाऊस हाेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी विजांचा कडकडाट हाेण्याचीही शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.