वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 22:25 IST2026-04-27T22:24:18+5:302026-04-27T22:25:32+5:30
अयोध्या मंदिराच्या बांधकामाच्या देशभरातील ३० सारथ्यांचा संघस्थानी सम्मान , मुस्लिम व्यक्तीलादेखील संघस्थानी निमंत्रण

वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
नागपूर : अयोध्येत श्रीराम मंदिर बांधले जाईपर्यंत, भारत एक हिंदू राष्ट्र आहे या दाव्यावर लोक हसायचे. मात्र आज तेच लोक म्हणत आहेत की भारत हा हिंदूंचा देश आहे. त्यांनी आम्हाला तशी घोषणा करायला सांगतात. मात्र असे काही घोषित करण्याची गरज नाही; भारत अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या बांधकाम प्रक्रियेत मौलिक भूमिका पार पाडणाऱ्या देशभरातील मान्यवरांचा सोमवारी नागपुरात त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला गोविंददेव गिरी महाराज, डॉ.हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष सुरेश उर्फ भैय्याजी जोशी उपाध्यक्ष श्रीधर गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. अयोध्येतील श्रीराम मंदिर कल्पनेपेक्षाही अधिक भव्य बांधले गेले आहे. आता आपणदेखील जगात धर्माची स्थापना होऊ शकेल असे भव्य काम केले पाहिजे. आज जगाला ज्याची गरज आहे, ती केवळ भारतच पूर्ण करू शकेल. दुसरा कोणताही देश भारताला वाचवणार नाही. भारतच स्वत:च्या भरवशावर प्रगती करेल आणि संपूर्ण जगाला वाचवेल. आपण त्याच्या पूर्ततेसाठी पूर्ण योगदान दिले पाहिजे. आज अनुकूलता दिसते आहे. अनकुलतेमुळे आराम मिळतो. मात्र ती सर्वात धोकादायक गोष्टदेखील आहे व तिला नाकारता येत नाही. रामराज्य केवळ राजामुळेच साध्य होत नाही; ते प्रजेमुळेही होते हे लक्षात ठेवले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.
मुस्लिम व्यक्तीलादेखील निमंत्रण -
अयोध्येतील मंदिरातील सिंहासन बनविण्याची जबाबदारी रमजानभाई या मुस्लिम व्यक्तीकडे होती. त्यांनादेखील या सत्कारासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र व्यक्तिगत कारणांमुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर देशात झाले परिवर्तन -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर देशात बदलाची प्रक्रिया सुरू झाली. मुघल साम्राज्याचा अंत झाला. ब्रिटिशांचे आगमन सुरू झाले होते. पण संघर्षाचा काळ जवळजवळ संपला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बदलाची प्रक्रिया सुरूच राहिली आणि भारताने टप्प्याटप्प्याने प्रगती केली, असे भैय्याजी जोशी म्हणाले.
यांचा झाला सत्कार
पंतप्रधानांचे माजी सल्लागार नृपेन्द्र मिश्र, गोविंददेवगिरी महाराज, चम्पत राय, जगदीश आफळे, गिरीश सहस्त्रभोजनी, जगन्नाथ गुळवे, आशिष सोमपुरा, निखिल सोमपुरा, अरुण योगिराज, जय काकतीकर, मनिष त्रिपाठी, सत्यनारायण पांडे, अनिल सुतार, केशव शर्मा, विनोद शुक्ला, राजीव दुबे, मनिष दाधीच, विनोद मेहता, अंकुर जैन, राजूकुमार सिंह, ए. व्ही. एस्. सूर्या श्रीनिवास, नरेश मालवीय, परेश सोमपुरा, नाथ अय्यर, संजय तिवारी, शरद बाबू , अनिल मिश्र, गोपाल, वासदेव कामत यांचा यावेळी सत्कार झाला.