विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 23:42 IST2026-04-27T23:41:48+5:302026-04-27T23:42:34+5:30
या एका जागेसाठी एकूण चार नावाची जोरदार चर्चा सुरू असून विक्रम काकडे यांचे नाव आघाडीवर असल्याची समजते. ३० एप्रिल २०२६ ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
राज्याच्या विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यांत संपत आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. या नऊ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अदित पवार)च्या वाट्याला एक जागा आली असून या एका जागेसाठी रस्सी खेच सुरू असल्याचे दिसते. या एका जागेसाठी एकूण चार नावाची जोरदार चर्चा सुरू असून विक्रम काकडे यांचे नाव आघाडीवर असल्याची समजते. ३० एप्रिल २०२६ ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
आता या एका जागेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आदी नेतेही उपस्थित राहणार असल्याचे समजते.
कोण आहेत विक्रम काकडे? -
विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आहे. तर सुरेश बिराजदार हे धाराशिव जिल्ह्याचे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. झिशान सिद्दीकी यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. तर राजेंद्र जैन हे पक्षाचे माजी विधान परिषद सदस्य अथवा आमदार असून प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात.
कुणाच्या वाट्याला किती जा? -
विधानसभेतील संख्याबळानुसार रिक्त होणाऱ्या जागापैकी भाजपच्या वाट्याला ५, शिवसेनेच्या वाट्याला २, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वाट्याला १ तर महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा येणार आहे.
या आमदारांचा कार्यकाळ संपणार -
येत्या १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या ९ सदस्यांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड (भाजप) आणि प्रवीण दटके यांचा समावेश आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम -
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे – २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)
उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे, २०२६ (शनिवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ४ मे, २०२६ (सोमवार)
मतदानाचा दिनांक – १२ मे, २०२६ (मंगळवार)
मतदानाची वेळ – सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
मतमोजणी (निकाल) – १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ०५:०० वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक – १३ मे, २०२६ (बुधवार)