'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 00:28 IST2026-04-28T00:27:52+5:302026-04-28T00:28:38+5:30
वयोमानानुसार उद्भवलेल्या काही आरोग्य समस्यांमुळे त्यांचे निधन झाले. अभिनेते अवतार गिल यांनी 'स्क्रीन'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. भरत कपूर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.

'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
भारतीय चित्रपटसृष्टी आणि टीव्ही शो गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे सोमवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. वयोमानानुसार उद्भवलेल्या काही आरोग्य समस्यांमुळे त्यांचे निधन झाले. अभिनेते अवतार गिल यांनी 'स्क्रीन'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. भरत कपूर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.
गिल यांनी म्हटले आहे की, "मी नुकताच स्मशान घाटावरून परतलो आहे. त्यांंच्या मुलाने मला फोन केला होता. त्याने सांगितले की, भरत कपूर हे गेल्या तीन दिवसांपासून अस्वस्थ होते. ते घरीच होते. यापूर्वी त्यांना रुग्नालयात दाखल करण्यात आले होते."
भरत कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, यावेळी राकेश बेदी, दिग्दर्शक रमेश कुमार, अभिनेते कुलदीप सिंह आणि इप्टा (IPTA) थिएटर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. ३० एप्रिल रोजी त्यांच्या निवास्थानी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
भरत कपूर यांच्या पश्चात पत्नी लोपा कपूर, मुले राहुल आणि सागर आणि मुलगी कविता अरोरा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा राहुल कपूर हा दिग्दर्शक आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली.
अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला -
भरत कपूर यांनी आपली अभिनयाची कारकिर्द १९७२ मध्ये सुरू केली होती. त्यांनी जवळपास ४० वर्षे चित्रपटसृष्टीला आपले योगदान दिले. त्यांनी प्रामुख्याने खलनायक आणि सहाय्यक व्यक्तिरेखा साकारून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी, 'नूरी', 'लव स्टोरी', 'गुलामी', 'आखिरी रास्ता', 'स्वर्ग', 'खुदा गवाह' आणि 'साजन चले ससुराल' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. केवळ चित्रपटच नव्हे, तर 'परंपरा', 'सांस', 'अमानत' आणि 'चंद्रकांता' यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमधूनही ते घराघरांत पोहोचले होते. भारतीय सिनेमातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.