Virat Kohli Achieves All Time IPL Record : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 'रन मशीन' विराट कोहलीनं नवा इतिहास रचला. आयपीएल स्पर्धेत ९००० धावांचा पल्ला गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ अवघ्या ७५ धावांत आटोपला. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीनं षटकार मारत संघाचा विजय निश्चित केला. त्याआधी त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ११ धावा करताच कोहलीच्या नावे महारेकॉर्डची नोंद झाली. IPL मधील २७५ सामन्यातील २६७ व्या डावात त्याने ९००० धावांचा पल्ला गाठला आहे. IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याच्या जवळपासही कोणी दिसत नाही. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने १५ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २३ धावांची खेळी केली.
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
IPL मध्ये सर्वाधिक धावांसह अनेक विक्रम
विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटसह आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त आयपीएलच्या माध्यमातून टी-२० क्रिकेटमध्ये सक्रिय दिसतो. २००८ च्या पहिल्या हंगामापासून तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग आहे. कोहलीनं आयपीएलमध्ये ९०१२ धावा करताना ८०८ चौकार आणि ३०५ षटकार मारले आहेत. सर्वाधिक धावा करण्यासोबतच IPL मध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही किंग कोहलीच्या नावे आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून ८ शतके पाहायला मिळाली आहेत. कोहलीनं आयपीएलमध्ये ६६ अर्धशतके झळकावली असून ११३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. एका हंगामात सर्वाधिक ४ शतके ठोकण्याचा पराक्रमही त्याच्याच नावे आहे. २०१६ च्या हंगामात त्याने ही कामगिरी करून दाखवली होती.