भारतातील 'या' कंपन्या आपल्या कर्मचारी आणि कुटुंबीयांना देणार मोफत करोनाची लस!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:49 PM2021-03-04T17:49:43+5:302021-03-04T17:59:39+5:30

देशात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला आता वेग आला आहे. कोविडयोद्ध्यांनंतर आता सामान्य नागरिकांनाही कोरोनाची लस टोचण्याची मोहिम देशात सुरु झालीय. आता भारतातील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतलाय. जाणून घेऊयात...

भारतातील काही दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज 'इन्फोसिस लिमिटेड' ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देणार आहे.

इन्फोसिससोबतच कन्सल्टिंग आणि आऊटसोर्सिंग सर्विसेज प्रोव्हायडर अॅक्सेंचर कंपनीनंही (Accenture) आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे.

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार इन्फोसिस आरोग्य सेवा देणाऱ्यासोबतच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या लसीकरणावर विचार करत आहेत. इन्फोसिसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रविण राव यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

इन्फोसिस आणि अॅक्सेंचरसोबतच आणखी काही कंपन्यांनी कोरोना लस खरेदी करण्याची तयारी देखील सुरू केली आहे. यात महिंद्रा ग्रूप आणि आयटीसी सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

भारतात सध्या कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात वयाच्या ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. तर सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांच्या वरील व्यक्तींनाही लस घेता येत आहे.

देशात सध्या १० हजार सरकारी केंद्रांवर मोफत कोरोना लशीचा डोस मिळत आहे. तर खासगी केंद्रांवर २५० रुपयांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आगामी काळात देशातील आणखी काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यासाठी पुढाकार घेताना दिसतील, असं सांगितलं जात आहे.