Vinod Tawde: विनोद तावडेंचे झाले प्रमोशन! भाजपने मोठी जबाबदारी सोपवली; पक्षातील स्थानही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 04:26 PM2021-11-21T16:26:02+5:302021-11-21T16:31:34+5:30

Vinod Tawde: मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेल्या विनोद तावडेंना भाजपने आता पदोन्नती दिली आहे.

भारतीय जनता पक्ष (BJP) ने राष्ट्रीय स्तरावर काही बदल आणि नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये भाजपचे माजी आमदार आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांना प्रमोशन देण्यात आले आहे. पक्षाकडून भाजपला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

सन २०१९ मधीन विधानसभा निवडणुकांमध्ये विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, या नवीन जबाबदारी देऊन भाजपने विनोद तावडे यांचे पुनर्वसन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय समितीची घोषणा झाली असून, यामध्ये विनोद तावडे यांची भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तावडे हरियाणाचे प्रभारी म्हणून काम पाहत होते. राष्ट्रीय चिटणीस पदावरून तावडे यांची आता राष्ट्रीय सरचिटणीस पदावर पदोन्नती झाली आहे.

पंतप्रधानांच्या मन की बातचे समन्वयक, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ही समन्वयक झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्याच्या राजकारणातून दूर असलेले तावडे आता राष्ट्रीय राजकारणात, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विनोद तावडे विधानपरिषदेवर निवडून गेले होते. यावेळी शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत तावडेंना तिकिट नाकारण्यात होते. त्यामुळे तावडे नाराज होते. पण आता त्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, असे म्हटले जात आहे.

विनोद तावडे यांनी यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस, मुंबई भाजप अध्यक्ष आणि १२ व्या आणि १३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समितीचे प्रमुख सदस्यपद भूषवले आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी परिपत्रक काढून एक घोषणा केली. यामध्ये पाच जणांना मोठी जबाबदारी दिली. यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचे नाव आहे.

तर झारखंडच्या आशा लकडा आणि बिहारचे ऋृतुराज सिन्‍हा यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या भारती घोष आणि शहजाद पूनावाला यांना राष्‍ट्रीय प्रवक्‍ता करण्यात आले आहे.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांच्यासह माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही तिकीट नाकारण्यात आले होते. मात्र, आता चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेचे तिकीट देण्यात आले आहे. यामुळे भाजपने दोन मोठ्या नेत्यांचे पुनर्वसन केल्याचे सांगितले जात आहे.