जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 18:04 IST2026-04-26T17:59:57+5:302026-04-26T18:04:39+5:30
Mumbai LTT Ayodhya Dham Amrit Bharat Express Train: नव्या अमृत भारत ट्रेनमुळे अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेणे आता मुंबईकरांना अधिक सुलभ होणार आहे.

जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Mumbai Ayodhya Amrit Bharat Express Train: अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेणे आता मुंबईकरांना अधिक सुलभ होणार आहे. मुंबई ते अयोध्या धाम दरम्यान एक नवी कोरी अमृत भारत ट्रेन सुरू होणार आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचा शुभारंभ केला जाणार आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना जोडणारी या ट्रेनमुळे मुंबई ते अयोध्या मार्गाचा प्रवास किफायतशीर, आरामदायी, थेट सेवा प्रवाशांना प्रदान करेल, असे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुंबई ते अयोध्या मार्गावरील अमृत भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवू शकतात, असा कयास बांधला जात आहे. यासह वाराणसी ते हडपसर पुणे या मार्गावरील अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण केले जाणार आहे. पुश-पुल तंत्रज्ञानावर आधारित या अमृत भारत ट्रेन आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. तसेच या ट्रेनला नॉन एसी स्लीपर कोच जोडलेले आहे. लांब पल्ल्याचा प्रवास सुलभतेने होण्यासाठी अमृत भारत ट्रेन प्रवाशांना उपयुक्त ठरत असल्याचे म्हटले जाते.
मुंबई ते अयोध्या अमृत भारत ट्रेन कधी सुटणार, कुठे थांबणार?
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या धाम या मार्गावरून सुरू होणाऱ्या अमृत भारत ट्रेनचे साधारण वेळापत्रक समोर आले आहे. लोकार्पण सेवा अयोध्या धाम येथून सुरू होणार आहे. या ट्रेनची पहिली सेवा अयोध्या धाम येथून सुरू होणार आहे. २८ एप्रिल रोजी सायंकाळी ०४ वाजून ४५ मिनिटांनी अयोध्या धाम येथून सुटेल. तर प्रयागराज जंक्शन येथे पहिली लोकार्पण सेवा ट्रेन रात्री ०९.३० वाजता पोहोचेल. तेथून जबलपूरला पहाटे ०४.२० वाजता, इटारसीला सकाळी ०८ वाजता, भुसावळ येथे दुपारी १२.३० वाजता, नाशिक रोड येथे सायंकाळी ०४.१० वाजता, कल्याणला सायंकाळी ०७.०५ वाजता या मार्गाने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २९ एप्रिल रोजी रात्री ०८.३० वाजता पोहोचेल.
दरम्यान, अयोध्या धाम ते मुंबई एलटीटी अमृत भारत ट्रेनला २२ एलएचबी कोच असणार आहेत. ही अमृत भारत ट्रेन अयोध्या धाम, सुल्तानपूर, प्रतापगड, प्रयागराज, मानिकापूर, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव, नाशिक, कल्याण मार्गा मुंबई एलटीटी स्टेशनवर पोहोचणार आहे. सदरचे वेळापत्रक उद्घाटन स्पेशल सेवेचे असून, नियमित सेवेचे टाइमटेबल लवकरच जाहीर केले जाईल, असे सांगितले जात आहे.