आम आदमी पार्टीच्या ७ राज्यसभा खासदारांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) विलीन होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सात खासदारांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांचाही समावेश आहे. हरभजन यांच्या भाजप प्रवेशाने त्याच्या चाहत्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये तीव्र संताप बघायला मिळत आहे.
हरभजन सिंगसहआपच्या या सात राज्यसभा खासदारांनी २४ एप्रिल रोजी भाजपत प्रवेश केल्या नंतर, जालंधरमधील हरभजन सिंगच्या घराबाहेर संतप्त समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी समर्थकांनी हरभजनच्या घराच्या भिंतीवर पंजाबी आणि इंग्रजी मध्ये स्प्रे पेंटने 'गद्दार' लिहिले. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, ज्यावेळी आंदोलक हे कृत्य करत होते, तेव्हा तिथे पोलीस प्रशासनही उपस्थित होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते.
१० पैकी ७ खासदार भाजपत -
राज्यसभेत आम आदमी पार्टीचे एकूण १० खासदार होते, यांपैकी ७ जणांनी पक्षाला रामराम ठोकला. यात हरभजन सिंग, राघव चड्ढा, स्वाती मालीवाल, अशोक मित्तल, संदीप पाठक आणि राजेंद्र गुप्ता यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे. राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत बोलवून भाजप प्रवेशासंदर्भात घोषणा करत आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप केले होते.
हरभजनची क्रिकेट कारकीर्द
हरभजन सिंगने भारतासाठी १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४१७, वनडेमध्ये २६९ आणि टी-२० मध्ये २५ बळी घेतले आहेत. याशिवाय, बॅटिंगमध्ये, हरभजनने कसोटीत २२२४ धावा, एकदिवसीय सामन्यांमध्ये १,२३७ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०८ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत दोन शतके आणि नऊ अर्धशतकेही झळकावली आहेत.