"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 18:43 IST2026-04-26T18:40:54+5:302026-04-26T18:43:53+5:30
यावेळी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना इशारा देत म्हणाले, "जे बेकायदेशीरपणे आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून बंगालमध्ये राहत आहेत, त्यांनी २९ एप्रिलआधी देश सोडावा. अन्यथा, ४ मे नंतर प्रत्येक घुसखोराला हकलून लावले जाईल. आता तृणमूल काँग्रेस एकाही घुसखोराला वाचवू शकणार नाही."

"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. आज (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला मोठी आश्वासने देत ममता बॅनर्जी सरकारवर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी ममता सरकारवर घुसखोरांना आश्रय दिल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, भाजप सत्तेवर आल्यास या घुसखोरांना बाहेर काढले जाईल आणि तृणमूल काँग्रेस कुणालाही वाचू शकणार नाही, असेही मोदी म्हणाले. ते बनगांव येथे जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना इशारा देत म्हणाले, "जे बेकायदेशीरपणे आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून बंगालमध्ये राहत आहेत, त्यांनी २९ एप्रिलआधी देश सोडावा. अन्यथा, ४ मे नंतर प्रत्येक घुसखोराला हकलून लावले जाईल. आता तृणमूल काँग्रेस एकाही घुसखोराला वाचवू शकणार नाही."
शरणार्थी कुटुंबांना हक्काची जागा देणार -
पश्चिम बंगालमधील मतुआ, नामशूद्र आदी शरणार्थी कुटुंबांना आश्वासन देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्याला केवळ नागरिकताच मिळणार नाही तर हक्काचा पत्ता, भारतीय नागरिकाला मिळणारे सर्व हक्क आणि कागदपत्रेही मिळतील. ही 'मोदींची गॅरंटी' आहे.
मोदी पुढे म्हणाले, ज्या पद्धतीने गंगेचे उगमस्थान गंगोत्री आहे, त्याच प्रकारे भाजपचे मुळ जनसंघ आहे आणि जनसंघाचे उगमस्थान बंगाल आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधूनच जनसंघाचे खाते उघडले होते. तेव्हा कोलकात्यातून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी निवडून आले होते. दरम्यान जेव्हा फाळणी झाली, तेव्हा जनसंघ पूर्वबंगालमधील शरणार्थींसोबोत ठामपणे उभा होता. असेही मोदी म्हणाले.
महिलांसाठीही मोठ्या घोषणां -
यावेळी डबल इंजिन सरकारमुळे बंगालच्या लेकींना दुप्पट फायदा होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. त्यांनी पश्चिम बंंगालमधील स्त्री शक्तीलाही मोठी गॅरंटी दिली. भाजपचे सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरवर्षी ३६००० रुपये जमा केले जातील. तसेच, मुलींना सरकारी नोकरीत ३३ टक्के आरक्षण दिले जाईल. याच बरोबर, अंगणवाडी सेविका आणि महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाबासंदर्भातही मोठी घोषणा करण्यात आली.