जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 18:39 IST2026-04-26T18:38:14+5:302026-04-26T18:39:30+5:30
जगभरातील तज्ञांमध्ये उत्सुकता वाढली; २५ कोटी रुपयापर्यंत बोली लागण्याचा अंदाज!

जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
जयपूरच्या शाही घराण्याचे अत्यंत दुर्मीळ खगोलीय उपकरण 'Astrolabe' येत्या २९ एप्रिल रोजी लंडन येथे लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे. १७व्या शतकात बनवलेले हे भव्य यंत्र त्या काळातील “सुपरकॉम्प्युटर” म्हणून ओळखले जाते. हे यंत्र त्याच्या बहुउपयोगी क्षमतेमुळे तज्ज्ञांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
शाही वारसा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी
हे यंत्र जयपूरचे तत्कालीन महाराजा सवाई मानसिंह II यांच्या खासगी संग्रहाचा भाग होते. त्यांच्या निधनानंतर ते गायत्री देवी यांच्याकडे राहिले आणि नंतर एका खाजगी संग्रहात गेले. आता प्रथमच हे यंत्र सार्वजनिकरित्या प्रदर्शित होत असून लिलावासाठी उपलब्ध झाले आहे.
यंत्राची वैशिष्ट्ये...
या यंत्राचे वजन सुमारे ८.२ किलो असून, उंची सुमारे ४६ सेंटीमीटर (सामान्य एस्ट्रोलाबपेक्षा चारपट मोठे) आहे. तज्ज्ञांच्या मते, या उपकरणाची किंमत १.५ ते २.५ मिलियन पाउंड (सुमारे ₹१५ ते ₹२५ कोटी) दरम्यान जाऊ शकते. यामुळे खगोलीय उपकरणांच्या लिलावातील पूर्वीचे सर्व विक्रम मोडले जाऊ शकतात.
‘ऑल-इन-वन’ वैज्ञानिक साधन
ऑक्सफर्डच्या इतिहासतज्ज्ञ फेडरिका गिगांटे यांच्या मते, १७व्या शतकात या यंत्राद्वारे खालील गोष्टी मोजल्या जात:
सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ
तार्यांची अचूक स्थिती
विहिरीची खोली आणि इमारतींची उंची
पंचांगाच्या मदतीने कुंडली तयार करणे
यामुळे हे यंत्र त्या काळातील अत्यंत प्रगत वैज्ञानिक साधन मानले जाते.
विज्ञान आणि संस्कृतीचा संगम
हे एस्ट्रोलाब १७व्या शतकाच्या सुरुवातीला लाहोरमध्ये तयार करण्यात आले होते. त्याचे निर्माते कायम मुहम्मद आणि मुहम्मद मुकीम हे ‘लाहोर स्कूल’मधील प्रसिद्ध कारागीर होते. या यंत्रावर तार्यांची नावे फारसी भाषेत असून, त्याच्या शेजारी संस्कृत नावे देवनागरी लिपीत कोरलेली आहेत. यामुळे त्या काळातील भारतीय आणि इस्लामी संस्कृतीचा सुंदर संगम दिसून येतो.
आजही अचूक गणना
हे यंत्र मुघल काळातील प्रशासक आका अफजल यांच्यासाठी तयार करण्यात आले होते, जे जहांगीर आणि शाह जहान यांच्या कारकिर्दीत कार्यरत होते. यात ९४ शहरांचे अक्षांश-रेखांश आणि ३८ तार्यांचे पॉइंटर्स दिलेले आहेत. आजही हे यंत्र खगोलीय वस्तूंची अचूक उंची मोजू शकते, ही त्याची सर्वात मोठी खासियत आहे.
जागतिक स्तरावर मोठी उत्सुकता
जगभरातील संग्रहालये आणि खाजगी संग्राहक या दुर्मीळ वैज्ञानिक वारशासाठी उत्सुक आहेत. याच्या ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे हा लिलाव जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. जयपूरच्या शाही वारशातील हा एस्ट्रोलाब केवळ एक उपकरण नसून विज्ञान, इतिहास आणि संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. लंडनमधील लिलावात याला मिळणारी किंमत आणि प्रतिसाद हे या वारशाचे जागतिक महत्त्व अधोरेखित करतील.