IPL 2026 CSK vs GT Match Result: साई सुदर्शनच्या दमदार खेळीसह कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलरच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने चेपॉकच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सला एकतर्फी मात दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या आश्वासक अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १५८ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाने ८ विकेट्स आणि २० चेंडू राखून दिमाखदार विजय नोंदवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चेन्नईच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांचा फ्लॉप शो
चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन ११ (१५), उर्विल पटेल ४ (३) आणि इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेला सरफराज खान खातेही न उघडता माघारी फिरला. पॉवर प्लेमध्ये २६ धावांत आघाडीच्या तीन फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली.
ऋतुराज गायकवाडची लढवय्या खेळी
शंभरीच्या आत अर्धा संघ तंबूत परतल्यावर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे जोडी जमली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४३ चेंड़ूत ५९ धावांची भागीदारी रली. दुबे २२ धावा करुन माघारी फिरल्यावर ऋतुराज शेवटपर्यंत मैदानात थांबला. त्याने ६० चेंडूत केलेल्या ७४ धावांच्या जिगरबाज खेळीसह अखेरच्या षटकात जेमी ओवर्टन याने ६ चेंडूत केलेल्या १८ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून कगिसो रबाडा याने सर्वाधिक ३ तर अर्शद खान याने २ आणि मोहम्मद सिराज आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शनसह गिल बटलरचा जलवा
अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. लयीत दिसणाऱ्या शुभमन गिलला संजूनं अप्रतिम स्टंपिंगसह तंबूचा रस्ता दाखवला. त्याने २३ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकार मारले. साई सुदर्शन सामना संपवूनच परतण्याच्या मूडमध्ये होता. पण अकील होसीनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादत त्याने विकेट गमावली. त्याने ४६ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची दमदार खेळी केली. षटकारासह गुजरात टायटन्सचा विजय निश्चित करणाऱ्या जोस बटलरनं ३० चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या.