सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 21:38 IST2026-04-26T21:25:44+5:302026-04-26T21:38:11+5:30
विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान ४४ अंशांच्या पुढे; सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा क्रमांक

सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
अकोला : उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होरपळून निघत आहे. रविवारी तर विदर्भात सूर्य कोपला की काय, असेच चित्र पाहायला मिळाले. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात ४६.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, हे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान आहे. अकोल्यापाठोपाठ सर्वाधिक तापमान नोंदवलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा क्रमांक आहे.
विदर्भात गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट सुरू आहे. सातत्याने देशातील सर्वाधिक तापमान अकोला आणि विदर्भातील काही प्रमुख शहरांमध्ये नोंदवले जात आहे. रविवारी तर या उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक गाठला गेला. गेल्या दशकभरातील सर्वाधिक तापमानाच्या उंबरठ्यावर यावर्षीचे तापमान येऊन पोहोचले असून, अशीच परिस्थिती काही काळ कायम राहिल्यास या दशकातील तापमानाचा उच्चांक मोडण्याची शक्यता आहे.
असे होते विदर्भातील रविवारचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
अकोला : ४६.९
अमरावती : ४६.८
वर्धा : ४६.४
यवतमाळ : ४६.०
नागपूर : ४५.४
चंद्रपूर : ४५.०
वाशिम : ४४.६
गडचिरोली : ४४.६
गोंदिया : ४४.४
ब्रह्मपुरी : ४४.२
भंडारा : ४४.०
बुलढाणा : ४३.५