भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 20:00 IST2026-04-25T19:58:51+5:302026-04-25T20:00:26+5:30
BJP Anupama Jaiswal And Akhilesh Yadav : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. विरोधकांचा निषेध करत असलेल्या नगरच्या आमदार आणि माजी मंत्री अनुपमा जयस्वाल या सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुतळा जाळत असताना झालेल्या स्फोटात भाजल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे २:२० वाजता जिल्हाधिकारी (डीएम) चौकात भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. आमदार अनुपमा जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या पुतळ्याचं दहन केलं जात होतं.
आमदारांनी पुतळ्याला आग लावण्यासाठी जशी माचिस पेटवली, तसा पुतळ्याच्या आत अचानक जोरदार स्फोट झाला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल राय यांनी सांगितलं की, पुतळ्यामध्ये कदाचित पेट्रोलचं प्रमाण जास्त होतं, ज्यामुळे आगीचा गोळा थेट आमदारांच्या चेहऱ्यावर आला. आमदारांचं कपाळ आणि केसाला आग लागली होती, जी कार्यकर्त्यांनी लगेचच विझवली आणि त्यांना पोलिसांच्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
आग लगानेवाले सावधान रहें।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 25, 2026
आग लगानेवाली महिला की इलाज की व्यवस्था की जाए। pic.twitter.com/nHkkTdU54m
महाराजा सुहेलदेव मेडिकल कॉलेजचे सीएमएस मदन मोहन मणी त्रिपाठी यांनी सांगितलं की, आमदारांना इमर्जन्सी विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या कपाळावर ४.५ टक्के 'सुपरफिशियल बर्न इन्जरी' झाली आहे. त्यांच्या डोक्यावरचे काही केसही जळाले आहेत, मात्र दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या डोळ्यांना कोणतीही इजा झालेली नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर,सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी 'X' (ट्विटर) वर टोला लगावत लिहिलं की, "आग लावणाऱ्यांनी सावध राहावं! आग लावणाऱ्या महिलेच्या उपचारांची योग्य व्यवस्था करण्यात यावी." घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अक्षय त्रिपाठी आणि एसपी विश्वजीत श्रीवास्तव यांनी मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन आमदारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुतळ्यामध्ये नेमका कोणता पदार्थ होता ज्यामुळे अचानक स्फोट झाला, याचा तपास आता प्रशासन करत आहे.