प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण आजच्या आधुनिक युगात प्रेम 'डिजिटल'ही झालं आहे. 'मेल एलाइज यूके'ने केलेल्या एका लेटेस्ट आणि धक्कादायक रिसर्चने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या रिसर्चनुसार, 'जेन अल्फा' (Gen Alpha) म्हणजेच १२ ते १६ वयोगटातील आजची मुलं आता खऱ्या मुलींशी मैत्री किंवा डेटिंग करण्याऐवजी 'AI गर्लफ्रेंड'ला जास्त पसंती देत आहेत.
ज्या वयात मुलं बागेत किंवा सिनेमा हॉलमध्ये फिरतात, त्या वयात आताची मुलं मोबाईल स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबत (AI) मन रमवत आहेत. AI गर्लफ्रेंडची क्रेझ जास्त वाढत आहे. याला 'डिजिटल लव्ह' म्हटलं जात असलं, तरी मानसशास्त्रज्ञ मात्र याकडे समाज आणि मानसिक आरोग्यासाठी एक मोठा धोका म्हणून पाहत आहेत.
Gen Alpha ला हा मार्ग का आवडतोय?
याचं सर्वात मोठं कारण म्हणजे साधेपणा आणि नियंत्रण. AI सोबत संवाद साधताना ना कोणतं भांडण होतं, ना कोणताही वाद. सर्व काही आपल्या मर्जीनुसार चालतं. जेन अल्फाला यामध्ये एक प्रकारचा आराम वाटतो. समोरचा व्यक्ती काय विचार करेल किंवा आपल्याला नाकारेल (रिजेक्शन) का, याची भीती त्यांना वाटत नाही. याच कारणामुळे ते अशा डिजिटल नात्यांकडे ओढले जात आहेत.
खरं नातं अवघड का वाटतं?
कमी वयात नाती निर्माण करणं प्रत्येकासाठी सोपं नसतं. संकोच, लाजाळूपणा आणि भावना समजून घेणं अनेकदा कठीण जातं. अशा परिस्थितीत AI हा एक सोपा मार्ग बनतो, जिथे प्रत्येक उत्तर मनासारखं मिळतं आणि कोणतंही 'जजमेंट' नसतं. हळूहळू ही सवय बनते आणि खऱ्या लोकांशी संवाद कमी होऊ लागतो.
चिंतेची बाब काय?
हे सर्व ऐकायला जरी सोपं आणि आरामदायक वाटत असलं, तरी यामागे काही गंभीर प्रश्न उभे राहत आहेत. मुलं जर खऱ्या नात्यांपासून दुरावली, तर भविष्यात त्यांना माणसं समजून घेण्यात आणि नाती निभावण्यात अडचणी येऊ शकतात. कारण खऱ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही.
एकटेपणाचं नवीन रूप
AI सोबतचं हे नातं एक प्रकारे एकटेपणा लपवण्याचं साधन ठरू शकतं. बाहेरून कोणीतरी सोबत असल्यासारखं वाटलं तरी प्रत्यक्षात ती व्यक्ती एकटीच असते. जर ही सवय जडली, तर माणूस खऱ्या जगापासून तुटू शकतो. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याऐवजी तो स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवू लागतो.
